sushil modi: नितीश कुमारांसोबतची घट्ट मैत्री सुशील मोदींना पडली महागात?

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

बिहार भाजपमधील हालचालीला वेग आला आहे.

पाटणा- बिहार भाजपमधील हालचालीला वेग आला आहे. सुशील मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन डेप्युटी सीएम पद हटवल्याने ते उपमुख्यमंत्री होणार नाहीत, हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अशा चर्चा सुरु झाल्यात की नितीश कुमारांसोबतची जवळची मैत्री त्यांना महागात पडत आहे. 

नितीश कुमार आणि सुशील मोदी यांची मैत्री जगजाहीर आहे. अनेकदा जेडीयू नेत्यांपेक्षा मोदी यांनी नितीश कुमारांना डिफेंड केलं आहे. 15 वर्षाच्या सरकारमध्ये नितीश कुमार आणि सुशील मोदी यांना कोणतीही अडचण आली नाही. पण, भाजप नेतृत्वाला ही मैत्री 2012 पासूनच खटकत आली आहे. तेव्हा सुशील मोदी यांनी नितीश कुमारांना 'पीएम मटेरियल' असं म्हटलं होतं. दुसरीकडे बिहार भाजपचे नेते नरेंद्र मोदींच्या नावाला उचलून धरत होते.  

नितीश कुमार पीएम मटेरियल- सुशील मोदी

2014 च्या लोकसभा निवडणुकीवेळी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचे नाव जोरदार चर्चेत होते. गुजरात दंगलीप्रकरणी नितीश कुमारांचा पक्ष नरेंद्र मोदींना विरोध करत होता. यावेळी बिहारमधील भाजपचे अनेक बडे नेते नरेंद्र मोदींचे नाव पुढे करत होते. यावेळी सुशील मोदी यांनी 2012 मध्ये एका मुलाखतीत बोलताना नितीश कुमार पंतप्रधान पदासाठी योग्य असल्याचं म्हटलं होतं. सुशील मोदींच्या या वक्तव्याने भाजपमध्ये खळबळ उडाली होती. सुशील मोदींची गोष्ट भाजपला आवडली नव्हती. याचीच किंमत सुशील मोदी यांना चुकवावी लागत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

सुशील मोदी यांचा पत्ता कट? उप-मुख्यमंत्रीपदी नव्या नेत्याला संधी

उपमुख्यमंत्री म्हणून नितीश कुमारांची पसंती नेहमीच सुशील मोदीच राहिले आहेत. जेव्हा जेव्हा नितीशकुमार ताकदवान झाले तेव्हा सुशील मोदींची खुर्ची सुरक्षित राहिली. 15 वर्षानंतर पहिल्यांदाच नितीश कुमार एनडीएमध्ये कमजोर झाले आहेत. त्यामुळे सुशील मोदींचा पत्ता राज्यातून कट करण्यात आल्याचे सांगण्यात येतंय.

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला 74 तर जेडीयूला 43 जागा मिळाल्या आहेत. अशा परिस्थितीत भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आला आहे. आपली जागा आणखी मजबूत करण्यासाठी भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार आहे. गेल्या 15 वर्षात भाजपमध्ये दुसऱ्या लाईनचा कोणताही नेता तयार झालेला नाही. नितीश कुमार कमकुवत झाल्याने भाजपचा सरकारमध्ये हस्तक्षेप वाढणार आहे. अशावेळी नेहमी नितीश कुमारांची बाजू घेणारे सुशील मोदी अडचणीचे ठरु शकतात. त्यामुळे भाजपने या दोघांना वेगळे करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येतंय.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushil modi and nitish kumar friendship in bihar