सुशील मोदी यांचा पत्ता कट? उप-मुख्यमंत्रीपदी नव्या नेत्याला संधी

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 15 November 2020

बिहारमध्ये रविवारी एनडीएची बैठक झाली.

पाटणा- बिहार राज्यात एनडीए सरकारमध्ये खूप काळापासून उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे सुशील मोदी (Sushil Modi) यांना केंद्रात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी दिली जात आहे. त्यांच्या जागी बिहारचे उपमुख्यमंत्री म्हणून ताडकिशोर प्रसाद असतील. ताडकिशोर प्रसाद कटिहार मतदारसंघातून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. सुशील मोदी यांना केंद्रात कॅबिनेट मंत्र्याची जागा मिळणार आहे. त्यामुळे नितीश कुमार आणि सुशील मोदी यांची जोडी वेगळी होणार आहे. 

बिहारमध्ये रविवारी एनडीएची बैठक झाली. यावेळी नितीश कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्याचबरोबर ताडकिशोर प्रसाद यांची भाजप विधानमंडल दलाचा नेता म्हणून सर्वानुमते निवड झाली. त्यांची नेता म्हणून निवड झाल्यानंतर सुशील मोदी यांनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे सुशील मोदी बिहारचे उपमुख्यमंत्री होणार नाहीत हे स्पष्ट झाले आहे. 

"नितीश कुमार मुख्यमंत्री असतील, पण रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे असेल'...

सुशील मोदी यांनी ताडकिशोर प्रसाद यांची उपमुख्यमंत्री म्हणून घोषणा झाल्यानंतर लगेच ट्विट केलं आहे. भाजप आणि संघ परिवाराने 40 वर्षात खूप काही दिलं, जे क्वचितच दुसऱ्या कोणत्या नेत्याला मिळाले असेल. पुढेही जी जबाबदारी मिळेल, ती मी निभावेन. कार्यकर्त्याचे पद तर कोणी माझ्याकडून हिसकावून घेऊ शकत नाही, असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत. 

दरम्यान, जनता दल संयुक्तचे नेते नितीश कुमार सातव्यांदा बिहार राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. सोमवारी सायंकाळी त्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये निसटता विजय प्राप्त केल्यानंतर सत्ताधारी एनडीएने आज रविवारी एक महत्त्वाची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत भाजप-जेडीयू यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या मुख्य नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले. निवडणुकीत भाजपला 74 जागा तर जेडीयूला फक्त 43 जागा मिळाल्या आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sushil modi will not be next deputy cm tadkishor prasad