"स्वयम'मध्ये पुणे विद्यापीठ, "आयआयआयटी' रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी महाराष्ट्र, गोव्यातून दहा शिक्षणसंस्था 

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 5 मे 2018

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. "स्वयम' या कार्यक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे.

निवड झालेल्या संस्थांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि गोवा विद्यापीठांचा समावेश आहे. यानुसार हवामान बदल, नेतृत्व-प्रशासन, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, सागरी विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांत देशाला भविष्यातील दिशा दाखविण्याची जबाबदारी या उच्च शिक्षणसंस्था पार पाडणार आहेत. 

या वर्षअखेरपर्यंत या संस्थांनी उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक संस्थांचा अभ्यास करून गुणात्मक व व्यावहारिक बदलांबाबत केंद्राकडे आराखडा सादर करायचा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर तो देशभरात लागू करण्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल. देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये किमान सुमारे दीड कोटी प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील निवड झालेली 75 विद्यापीठे व आयआयटी, आयआयएम यांसारख्या शिक्षण संस्थांना एकेक विषय वाटून देण्यात आले आहेत. 

यात शास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, सामाजिक सुधारणा, प्रशासन व नेतृत्व, अभियांत्रिकी, व्यवस्थापनशास्त्र, इतिहास, लोकजीवन, ऑनलाइन ग्रंथालय, खगोलशास्त्र, सागरीविज्ञान आदी क्षेत्रांचा समावेश आहे. या 75 संस्थांनी संबंधित विषयांमधील नवीन अभ्यासक्रम, संशोधन, शैक्षणिक सुधारणांची क्षेत्रे, नवीन शिक्षणक्रम लागू करण्यासाठीची ऑनलाइन पूर्वतयारी व सामग्री याचा विस्ताराने आराखडा बनवून 31 डिसेंबर 2018 पर्यंत विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवायचा आहे. त्याचा अभ्यास करून संबंधित अभ्यासक्रमांचा विस्तार केला जाईल. त्यानंतर दरवर्षी एक ऑक्‍टोबरपासून या प्राध्यापकांना नवीन विषयांबाबतची शैक्षणिक सामग्री उपलब्ध करून देण्यात येईल. यात उल्लेखनीय शोधकार्य करणाऱ्या प्राध्यापकांना व शिक्षणसंस्थांना राष्ट्रीय पातळीवर सन्मानित करण्याचीही मंत्रालयाची योजना आहे. 
--- 
"स्वयम'अंतर्गत निवडलेल्या राज्यातील संस्था व त्यांचे संशोधनाचे विषय ः 
- मुंबई विद्यापीठ ः अर्थशास्त्र 
- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ः नेतृत्व व प्रशासन 
- नागपूर विद्यापीठ ः आपत्ती व्यवस्थापन 
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद ः विज्ञान-तंत्रज्ञान 
- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती ः कौशल्य विकास 
- गोवा विद्यापीठ ः सागरी विज्ञान-तंत्रज्ञान 
- इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन रिसर्च (आयआयएसईआर) पुणे ः हवामान बदल 
- आयआयटी मुंबई ः ऊर्जाप्रणाली अभियांत्रिकी 
- आयआयआयटी, पुणे ः इलेक्‍ट्रॉनिक्‍स, संगणक अभियांत्रिकी 
- इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी- आंत्रप्रेन्युअरशिप, पुणे ः मूल्यमापन- प्रशिक्षण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Swayam Pune University IIIT Course