Take It Down : आक्षेपार्ह पोस्टविरोधात ‘टेक इट डाऊन’

गैरप्रकार करण्याच्या हेतूने काही लोकांकडून लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले जातात
Take It Down
Take It Downsakal
Summary

गैरप्रकार करण्याच्या हेतूने काही लोकांकडून लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले जातात

इंटरनेट, स्मार्टफोनच्या चांगल्या वापराबरोबरच गैरवापरही केल्याचे आपण बघतो. लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो वा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल होण्यावर; तसेच चाईल्ड पोर्नोग्राफीवर आळा घालण्यासाठी मेटा; तसेच नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉइटेड चिल्ड्रेनने (एनसीएमईसी) पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ‘टेक इट डाऊन’ हा उपक्रम सुरू केला आहे. त्याबाबत...

इंटरनेटच्या सहज उपलब्धेमुळे सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन आला आहे. हल्ली प्रत्येकजण समाजमाध्यमाचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहे. अनेकांनी तर समाजमाध्यमांतून उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण केले आहेत. फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्युब, ब्लॉगिंग आदींद्वारे वेगवेगळे विषय हाताळत कंटेन्टनिर्मिती केली जात आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्म मनाप्रमाणे काम करण्याची संधी, हवे ते विषय हाताळण्याचे स्वातंत्र्य आदींमुळे अनेकांनी नोकरी सोडत पूर्णवेळ डिजिटल क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य दिल्याचे आपण पाहतो.

बीड जिल्ह्यातील कोळगावसारख्या खेड्यातील अनेक तरुण सध्या डिजिटल कंटेन्टच्या माध्यमातून दरमहा लाखो रुपयांची कमाई करत आहेत. अशाप्रकारे अनेक सकारात्मक गोष्टी इंटरनेट, सोशल मीडिया, डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे करता येत असताना काही नतद्रष्ट मंडळींकडून या माध्यमांचा गैरवापरही केला जातो.

गैरप्रकार करण्याच्या हेतूने काही लोकांकडून लहान मुलांचे आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल केले जातात. चाईल्ड पोर्नोग्राफीच्या माध्यमातून खंडणी मागण्याचाही प्रकार केला जातो.

ज्या व्यक्तीबाबत हा गैरप्रकार घडला, त्यांची समाजात बदनामी होते. त्यांना प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता, मेटा आणि नॅशनल सेंटर फॉर मिसिंग ॲँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेनने पुढाकार घेत ''टेक इट डाऊन'' हा उपक्रम सुरू केला आहे.

१८ वर्षांखालील एखादा लहान मुलगा किंवा मुलगी चाईल्ड पोर्नोग्राफीची शिकार होते, किंवा त्यांचा आक्षेपार्ह फोटो वा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल केला जातो, अशा वेळी व्हायरल मजकूर हटवण्यासाठी TakeitDown.NCMEC.org या संकेतस्थळावर तक्रार दाखल करता येते. दाखल झालेल्या तक्रारीवरून व्हायरल झालेले आक्षेपार्ह फोटो वा मजकूर शोधून हटवल्या जाते.

कशी आहे कार्यप्रणाली?

हॅकिंग वा अन्य सायबर गुन्हेगारीच्या माध्यमातून १८ वर्षांखालील मुलांचा वा मुलींचा समाजमाध्यमावर व्हायरल झालेला फोटो वा व्हिडिओ तुम्हाला TakeitDown.NCMEC.org तक्रारस्वरूपात अपलोड करावा लागतो.

या संकेतस्थळावर अपलोड झालेल्या मजकूर एन्क्रिप्टेड स्वरुपात बदलल्या जातो, तसेच तो मजकूर हा हॅश व्हॅल्यूमध्ये (कोड स्वरूपात) रुपांतरित होतो. जेणेकरून त्याचा आणखी गैरवापर होणार नाही. तसेच ही संपूर्ण प्रक्रिया गोपनीय असून तक्रारदाराशिवाय अन्य कोणालाही ती बघता येत नाही.

फेसबुक, इन्स्टाग्राम, टिकटॉक, ओन्लीफॅन्स, युबो, पॉर्नहब आदी डिजिटल प्लॅटफॉर्म या उपक्रमात सहभागी आहेत. या प्लॅटफॉर्मवर तुमचा फोटो वा व्हिडिओ व्हायरल झालेला असल्यास तो शोधून हटवला जातो.

पीडित १८ वर्षांवरील असेल तर...

या प्रकारच्या घटना या केवळ लहान मुलांबाबतच घडतात असे नव्हे, तर १८ वर्षांवरील व्यक्तींबाबतही घडतात. अशा घटनांमध्ये तर मानसिक खच्चीकरण तसेच बदनामी मोठ्या प्रमाणात होते. आक्षेपार्ह व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पुढे खंडणी मागण्याचे प्रकार तर सध्या सर्रास घडत आहेत.

बदनामी करण्याच्या हेतूने खासगी फोटो वा व्हिडिओ व्हायरल केले जातात. अशावेळी https://stopncii.org/ या संकेतस्थळावर वरीलप्रमाणेच अर्ज भरून तक्रार दाखल करता येते. त्यावरून तक्रारीतील मजकुराप्रमाणे समाजमाध्यमावरील संबंधित आक्षेपार्ह मजकूर हटवण्याची कार्यवाही केली जाते.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com