काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या अभिनेत्री खुशबू पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

काहीच दिवसांपूर्वी खुशबू सुंदर या काँग्रेसचा त्याग करुन भाजपत दाखल झाल्या आहेत.

चेन्नई- तमिळनाडूमधील भाजपच्या नेत्या खुशबू सुंदर यांना पोलिसांनी मंगळवारी (दि.27) सकाळी चिदंबरम येथे जाताना ताब्यात घेतले. त्या विदुथलई चिरुथेगल काच्चिचे (व्हीसीके) प्रमुख टी तिरुमावलवन यांनी मनुस्मृतीवर केलेल्या टीकेचा विरोध करण्यासाठी जात होत्या. व्हीसीके प्रमुख टी तिरुमावलवन यांनी मनुस्मृतीवर बंदीची मागणी करत आंदोलन केले होते आणि हा ग्रंथ महिलांना अपमानित करणारा असल्याचा आरोप केला होता. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी खुशबू सुंदर या काँग्रेसचा त्याग करुन भाजपत दाखल झाल्या आहेत.

गेल्या शुक्रवारी तिरुमावलवन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी मनुस्मृतीचा हवाला देताना एका शब्दाचा वापर केला होता. त्यावरुनच नंतर राज्यात नव्या वादाला सुरुवात झाली होती. तिरुमावलवन यांनी महिलांचा अपमान केला असून हे हिंदूत्व विरोधात असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला होता.

परंतु, तिरुमावलवन यांनी महिलांचा अपमान केल्याचा आरोप फेटळला होता. तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तिरुमावलवन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

हेही वाचा- आदित्य पुरींनी 25 वर्षांनंतर HDFC बँकेला दिला निरोप, जगदीशन यांच्याकडे धुरा

यापूर्वी भाजपचे तमिळनाडूचे प्रमुख एल मुरुगन यांनी तिरुमावलवन यांच्यावर टीका केली होती. देश मनुस्मृतीने नव्हे तर संविधानानुसार चालतो. अशा नाहक मुद्द्यांवर वाद निर्माण करुन धोका देण्याचा काळ गेला आहे, असे ते म्हणाले होते. मनुस्मृती कोठे आहे? त्याचे कुठेच पालन केले जात नाही. आजच्या घडीला ते सुसंगत नाही, असेही ते म्हणाले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tamil Nadu BJP leader Kushboo Sundar detained by police