तामिळनाडुत कोरोनाचे गांभीर्य पाहून 16 नोव्हेंबरचा निर्णय मागे

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 November 2020

देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यातच अनलॉक प्रक्रियेअंतर्गत काही नियम शिथिल करण्याचे निर्णय राज्यांकडून घेतले जात आहेत.

चेन्नई - तमिळनाडू राज्यातील कोरोना संसर्गाचे वाढते रुग्ण पाहता तमिळनाडू सरकारने येत्या १६ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. त्याचवेळी विद्यापीठातही ठराविक अभ्यासक्रमच २ डिसेंबरपासून सुरू होणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.

केंद्र सरकारने देशभरात शाळा सुरू करण्याबाबत गेल्या महिन्यातच राज्यांना परवानगी दिली. अनलॉक ४ अंतर्गत २१ सप्टेंबरपासून काही राज्यात नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू केले. गृहमंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाकडून शाळा सुरू करण्याबात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या. अर्थात शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी राज्यांवर सोपवण्यात आली. मात्र कोरोनाचे वाढते गांभीर्य लक्षात घेता काही राज्यांनी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला.

येत्या १६ नोव्हेंबरपासून ९,१०,११ वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू होणार होते. मात्र आता राज्यसरकारने निर्णय परत घेतला आहे. पालकांकडून शाळा सुरू करण्याच्या निर्णयाबाबत चिंता व्यक्त केली गेली होती. तसेच विरोधी पक्ष द्रमुकने देखील या निर्णयाला आक्षेप घेतला होता. यावर आज निर्णय घेत आणखी काही शाळा बंदच ठेवण्याचे जाहीर केले गेले. शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग सुरूच राहणार आहेत.

हे वाचा - मध्य प्रदेशात पोटनिवडणूक जिंकलेल्या भाजपसमोर मोठं आव्हान

विद्यापीठ २ डिसेंबरपासून सुरू
तमिळनाडू राज्यात महाविद्यालये शाळांबराबेरच म्हणजेच १६ नोव्हेंबरपासून सुरू होणार होती. परंतु आता २ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. यात महाविद्यालय आणि विद्यापीठ हे केवळ पीएचडीसाठी संशोधन करणारे विद्यार्थी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारे विद्यार्थी यांना प्रवेश दिला जाईल. उर्वरित अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याबाबत नंतर निर्णय जाहीर केला जाईल. पुढील महिन्यांपासून ज्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू आहेत, त्यांनाच वसतीगृहाची सोय उपलब्ध करुन दिली जाईल, असे तमिळनाडू सरकारने म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamilnadu state govt take back order of start school from 16 nov