पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीनंतर रजनीकांत यांचं मोठं वक्तव्य

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 30 November 2020

सुपरस्टार रजनीकांत यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.

चेन्नई- सुपरस्टार रजनीकांत यांनी सोमवारी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर आपले विचार व्यक्त केले. तसेच त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आमचे नेते रजनीकांत जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा देण्याचे आश्वासन सर्व पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यानंतर रजनीकांत यांनी म्हटलंय की लवकरच राजनीतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला जाईल. 

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तामिळनाडूचा दौरा केल्यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भात सर्व पक्षांची सक्रियता वाढली आहे. अशा परिस्थितीत रजनीकांत यांचा पक्ष मक्कल मद्रम निवडणुकीच्या रिंगणात उतरेल का? असे प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. शिवाय राज्यात 2021 मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर रजनीकांत यांचा पक्ष निवडणुका लढण्याची दाट शक्यता आहे. रजनीकांत यांनी आज राघवेंद्र हॉलमध्ये मक्कल मंद्रमच्या जिल्हा सचिवांची एकत्र बैठक घेतली होती. 

भारत, बांगलादेशची चिंता वाढली; चीन उभारतंय ब्रह्मपुत्रा नदीवर धरण

2 वर्षांपासून राजकारणात सक्रिय

रजनीकांत गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. असे असले तरी त्यांची अधिकृतपणे राजकारणात एँट्री झालेली नाही. मागीलवर्षी कलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र येऊन काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे उभय नेते एकत्र येण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच रजनीकांत भाजपचे कमळ हाती घेतील अशीही एक अटकळ बांधली जात आहे.   

दरम्यान, रजनीकांत यांनी तमिळनाडूच्या राजकारणात क्रांती आणायची असल्याचे म्हटले होते. आपल्याला मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही, असेही त्यानी स्पष्ट केले होते. गेल्या महिन्यात रजनीकांत यांच्या नावाने एक पत्र व्हायरल झाले होते. यामुळे तमिळनाडूतील राजकारणात खळबळ उडाली होती. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रजनीकांत यांचा नियोजित राजकीय प्रवेश टळू शकतो, असे त्यात म्हटले होते. रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत डॉक्टर चिंतेत असल्याचे पत्रात म्हटले होते. यामुळे राजकारणात सहभागी होणे त्यांच्यासाठी धोकादायक ठरू शकते. परंतु, रजनीकांत यांनी हे पत्र आपण लिहिले नसल्याचे स्पष्ट केले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tamilnadu superstar rajnikant big announcement about politics