
UP: बाईकला हात लावला म्हणून दलित विद्यार्थ्याला बेदम मारहाण; शिक्षक निलंबित
बालिया - उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात दलितांवरील अत्याचाराची घटना समोर आली आहे. एका दलित विद्यार्थ्याने मोटारसायकलला हात लावल्याच्या कारणावरून एका शाळेतील शिक्षकाने मुलाला बेदम मारहाण केली. त्यानंतर शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. (Teacher suspended after beating dalit student news in Marathi)
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी मणिराम सिंह यांनी सांगितले की, याप्रकरणी गटशिक्षण अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशी केली असून तपासणी अहवालात शिक्षक प्रथमदर्शनी दोषी आढळले आहे. सिंह म्हणाले की, आरोपी शिक्षक कृष्ण मोहन शर्माला तत्काळ निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, पोलिसांनी शनिवारी या शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी आरोपी शिक्षकाला निलंबित केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील नागरा पोलीस स्टेशन हद्दीतील भीमपुरा क्रमांक 2 गावात राहणारा मुलगा हा नागरा शिक्षण क्षेत्रातील राणौपूर येथील उच्च माध्यमिक विद्यालयात सहाव्या वर्गात शिकतो. विद्यार्थ्याने सांगितले की, शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता लंचब्रेक दरम्यान शाळेतील शिक्षक कृष्ण मोहन शर्मा यांच्या मोटारसायकलला चुकून त्याचा हात लागला.
पीडित विद्यार्थी पुढे म्हणाला की, त्यानंतर शिक्षकाने त्याला शाळेतील एका खोलीत नेले आणि त्याची कॉलर पकडून खोलीत बंद केले. त्याला लोखंडी पाईप आणि झाडूने मारहाण करण्यात आली. तसेच त्याचा गळा दाबण्यात आल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला आहे. शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून त्याला वाचवल्याचे विद्यार्थ्याने सांगितले. या घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांनी शनिवारी शाळेत एकच गोंधळ घातला.
नगारा पोलिस ठाण्याचे प्रभारी देवेंद्र नाथ दुबे आणि गटशिक्षण अधिकारी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत लोकांना समजून काढली. पोलिस स्टेशनचे प्रभारी देवेंद्र नाथ दुबे यांनी सांगितले की, दलित विद्यार्थ्याची आई कौशिला हिच्या तक्रारीवरून शिक्षक कृष्ण मोहन शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.