esakal | शिक्षक बनणार नवसंशोधन दूत!
sakal

बोलून बातमी शोधा

Technology

शिक्षक बनणार नवसंशोधन दूत!

sakal_logo
By
संतोष शाळिग्राम

नवी दिल्ली - विद्यार्थ्यांनी (Student) शाळांमध्ये (School) गुणांच्या मागे धावण्यापेक्षा त्यांच्या डोक्यातील अचाट कल्पना त्यांनी मांडाव्यात. भविष्यात पदव्या घेऊन नोकरीसाठी फिरण्यापेक्षा नवसंशोधनाचे दान त्यांनी देशाला द्यावे, हीच अपेक्षा विद्यार्थ्यांकडून असते. मात्र, तसे अनुकूल वातावरण (Environment) शाळांमध्ये मिळत नाही. हा विचार करून केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण (Indian Technical Education) परिषदेने शिक्षकांमधून ‘नवसंशोधन दूत’ निर्माण करण्यासाठी पाऊल टाकले आहे. (Teacher will be the messenger of innovation)

विद्यार्थ्याचे आयुष्य घडविणारा व्यक्ती हा शिक्षक मानला जातो. मात्र, सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक ‘टेकसॅव्ही’ असतोच असे नाही. आताच्या नव्या पिढीतील मुलांना मिळणाऱ्या सुविधा, त्यांच्या हाती असलेली गॅझेट, माहिती मिळविण्याची निर्माण झालेली असंख्य साधने, यामुळे त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक रुंदावल्या जात आहेत. अशा स्थितीत शिक्षक त्यापेक्षा अधिक ज्ञानसंपन्न आणि नव्या पिढीतील विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखविण्यास समर्थ असला पाहिजे, ही संकल्पना ‘नवसंशोधन दूत’ या उपक्रमामागे आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कौशल्य शिक्षकांमध्ये रुजावे म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा नवसंशोधन विभाग, एआयसीटीई आणि केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) या हा नवसंशोधन उपक्रम हाती घेतला आहे. याअंतर्गत सीबीएसईच्या ५० हजार शिक्षकांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने हे प्रशिक्षण दोन महिन्यांत पूर्ण केले जाणार आहे. त्यातून देशातील सुमारे २५ हजार शाळांमधील मुलांना नंतरच्या काळात नवसंशोधनासाठी चालना मिळणार आहे.

हेही वाचा: म्हणून करुणानिधींनी त्यांच्या मुलाचं नाव स्टॅलिन ठेवलं!

प्रशिक्षणात काय मिळणार

 • नवसंशोधनाची कल्पना मांडणे, त्याचे मूलभूत प्रारूप तयार करणे.

 • चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोधण्याची दृष्टी.

 • चांगल्या कल्पनांना पाठबळ आणि त्याचा स्टार्टअपच्या दृष्टीने विचार.

 • बौद्धिक मालमत्ता हक्क, पेटंट विषयक ज्ञान.

 • संशोधनाचे रूपांतर उत्पादन व पेटंटमध्ये कसे करायचे याची माहिती.

 • नवकल्पनांचे तांत्रिक डिझाइन तयार करणे, त्याचे प्रारूप विकसित करण्याचे ज्ञान

नवकल्पना-नवसंशोधनाचा विचार करण्याची संस्कृती शाळांमध्ये रुजविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुलांमध्ये सर्जनशीलता खूप असते, ती ओळखता आली पाहिजे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षे त्यांना मदत केली जाणार आहे. येत्या १७ तारखेपासून या उपक्रमास सुरवात होईल.

- डॉ. अभय जेरे, मुख्य नवसंशोधन अधिकारी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय

शाळा, विद्यार्थ्यांना काय मिळणार

 • नवसंशोधन दूतांकडून त्यांची शाळा आणि जवळील शिक्षकांना प्रशिक्षण.

 • विद्यार्थी आणि शाळांमध्ये संशोधनाला चालना देणारी वातावरण निर्मिती.

 • चौकटीबाहेरचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांना शोधण्याचे कौशल्य शिक्षकांना मिळणार.

 • नवसंशोधन आणि स्टार्टअप विषयक माहिती शाळा-शाळांमध्ये रुजविली जाणार.

 • नवकल्पना स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागणार.

 • शिक्षकांचा गुणवत्ता आणि क्षमता विकास साधला जाणार.