esakal | चर्चा ‘टीम मोदी’च्या विस्ताराची; यांची वर्णी लागण्याचा अंदाज
sakal

बोलून बातमी शोधा

Narayan Rane and Heena Gavit

चर्चा ‘टीम मोदी’च्या विस्ताराची; यांची वर्णी लागण्याचा अंदाज

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी मंत्रिमंडळाच्या (Narendra Modi Mantrimandal) संभाव्य विस्ताराची (Expansion) घटिका आता अगदी जवळ आल्याची चर्चा राजधानीच्या राजकीय वर्तुळात पुन्हा सुरू झाली आहे. साधारणतः ७ जुलैच्या आसपास (बुधवारी) निश्चित मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगितले जाते. राज्यातून हीना गावित, रणजितसिंह निंबाळकर व नारायण राणे यातील एक-दोन जणांची वर्णी टीम मोदीमध्ये लागू शकते. (Team Modi Expansion Narayan Rane Hina Gavit Ranjitsinh Nimbalkar Politics)

नारायण राणे आणि हीना गावित यांना भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिल्लीत बोलावून घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे दोघेही उद्या (ता. ६) नड्डा यांना भेटण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी. एल. संतोष आणि नड्डा यांच्याशी काल (ता. ४) आणि आजही चर्चा केल्याचे समजते.

हेही वाचा: कोरोनाचा गरीब महिलांना सर्वाधिक फटका; अभ्यासातील माहिती

पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने २०१९ मध्ये घवघवीत बहुमत मिळवून सलग दुसऱ्या वेळेस केंद्रातील सत्ता मिळविली. त्यानंतर होणारा हा पहिलाच प्रस्तावित मंत्रिमंडळ विस्तार असल्याने त्याबद्दल जबरदस्त उत्सुकता आहे. किमान गेला महिनाभर पुन्हा विस्ताराची चर्चा सुरू झाली आहे. मोदी यांच्या विस्तारित टीममध्ये साधारणतः २० ते २१ नव्या नावांना सामावून घेतले जाण्याची शक्यता आहे. अर्थात विस्तार किंवा फेरबदल कधी करायचा हे पंतप्रधान व गृहमंत्री अमित शहा यांनाच माहिती असल्याने त्याबाबत चर्चा करण्याशिवाय राजकीय नेते व माध्यमांच्या हाती दुसरे काही नाही. राज्यातील वेगळ्याच भाजप नेत्यांचे नाव एनवेळी निश्चित करून मोदी आपले नेहमीचे धक्कातंत्रही वापरू शकतात.

मीनाक्षी लेखी यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय समितीची आज बैठक झाली, त्यामध्ये अनेक सदस्यांनी लेखी यांचे भावी मंत्रिपदाबद्दल अभिनंदनही केल्याचे समजते. दिल्लीतून लोकसभेच्या सातही जागा सलग दोनदा भाजपच्या पारड्यात टाकणाऱ्या दिल्लीकरांना गेली ७ वर्षे एकाच मंत्रिपदावर समाधान मानावे लागले आहे. सध्याच्या मंत्रिमंडळातील काही जणांना कामगिरीच्या आधारावर नारळही मिळू शकतो.

यांच्याही नावाची चर्चा

आगामी विस्तारात ज्योतिरादित्य शिंदे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, दिल्लीच्या खासदार मीनाक्षी लेखी आदींसह उत्तर प्रदेशातून रिटा बहुगुणा जोशी व अपना दलच्या अनुप्रिया पटेल यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.

loading image