मध्य रात्री उठून मेकअप करायला लावायचे अन्...

वृत्तसंस्था
बुधवार, 4 डिसेंबर 2019

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद स्वामीने एक देशच स्थापन केल्याचे वृत्त प्रसारीत झाले आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. आश्रमातील एका युवतीने लैंगिक शोषणाची माहिती देताना संताप व्यक्त केला आहे.

नवी दिल्लीः स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद स्वामीने एक देशच स्थापन केल्याचे वृत्त प्रसारीत झाले आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. आश्रमातील एका युवतीने लैंगिक शोषणाची माहिती देताना संताप व्यक्त केला आहे.

पीडित युवतीने प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले होते की, '2013 मध्ये गुरूकुलमध्ये आले होते. प्रथम आमचे मनोरंजन केले जात होते. पण, 2017 पासून भ्रष्टाचार सुरू झाला. स्वामींना जास्तीत जास्त पैसे मिळण्यासाठी आमच्याकडून प्रचार करून घेतला जात होता. पुढे आम्हाला मध्य रात्री उठवले जाऊन व्हिडिओ तयार केले जायचे. व्हिडिओ तयार करण्यापूर्वी भडक मेकअप करायला लावायचे. यामधून कोणाचीही सुटका होत नसे. व्हिडिओ तयार करताना अश्लिल भाषेचा वापर करायला लावायचे. अध्यात्माच्या नावाखाली नको-नको ते प्रकार करायला लावत. त्यांच्या विरोधात कोणी गेले तर ते खोलीमध्ये बंद करून ठेवत. माझ्या एका सहकारीला दोन महिने खोलीत बंद करून ठेवले होते.'

दरम्यान, स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू नित्यानंद स्वामीवर लैगिण शोषणाचा आरोप आहे. नित्यानंद स्वामी देश सोडून फरार झाला आहे. त्याने आता स्वतःचा एक देशच स्थापन केल्याची माहिती पुढे आली आहे. लॅटिन अमेरिकेजवळ, एक बेट विकत घेऊन त्याने कैलासा नावाचा देशच स्थापन केल्याची माहिती पुढे आली आहे.

काय आहे कैलासा देश?
'कैलासा' देशाची kailaasa.org वेबसाईटही सुरू करण्यात आली आहे. त्या वेबसाईटवरील माहितीनुसार 'इंडियाटुडे'नं एक बातमी प्रसिद्ध केलीय. या वृत्तात म्हटले आहे की, कैलासा हा असा देश आहे की, ज्याला कोणत्याही सीमा नाहीत. ज्या हिंदू धर्मियांचे त्यांच्यात देशात हिंदू धर्माचं पालन करण्याचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत. त्यांना या बेटावर अर्थात कैलासा देशात प्रवेश देण्यात येणार आहे. या वेबसाईटसोबतच nithyanandapedia.org ही सुरू करण्यात आले आहे. हे विकीपिडियासारखेच असून, नित्यांनंदापीडिया म्हणजे, भगवान श्री नित्यानंद परमेश्वरम यांचे ज्ञान प्राप्त करण्याची प्रक्रिया आहे. पुस्तके, ऑडिओ, व्हिडिओ आणि टेक्स्टच्या माध्यमातून हे ज्ञान देण्यात येईल, असे वेबसाईटवर म्हटले आहे.

केलासा देशाचे निश्चित लोकेशन हे अद्याप गूढ असले तरी, नित्यानंद स्वामीने लॅटिन अमेरिकेतील इक्वेडोर या देशाकडून हे बेट विकतच घेतल्याची माहिती मिळाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नित्यानंद स्वामीने नेपाळ मार्गे इक्वेडोरला पलायन केले होते. केलासा देशाची अधिकृत भाषा ही इंग्रजी, संस्कृत आणि तमीळ आहे. देशाची लोकसंख्या दहा लाख कोटी असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यातील 2 कोटी लोक हे हिंदू असल्याचे सांगण्यात आले आहे. कैलासा देशाचे राष्ट्रीय फूल कमळ असून, तर राष्ट्रीय प्राणी नंदी आहे.

कोण आहे नित्यानंद?
स्वामी नित्यानंदवर कर्नाटकमध्ये अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खटल्यांची सुनावणीही सुरू आहे. यात अपहरण, लैंगिक शोषण यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. तसेच गुजरातमध्येही अहमदाबादमधील त्याच्या आश्रमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: teen rescued from nithyanandas ashram reveals truth says had to make videos at night