बिहार सरकारविरुध्द तेजस्वी यादव यांनी  'दिवे' लावण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 September 2020

तेजस्वी यादव यांनी बिहारच्या नागरिकांना बुधवारी रात्री 9 वाजता घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या बाहेर दीवे, मेणबत्त्या आणि कंदील प्रज्वलित करण्याचे आवाहन केलं आहे.

पटना- कोरोनाकाळात देशाचा जीडीपी उणे 23 च्या पुढे गेला आहे. तसेच याकाळात देशात बेरोजगारीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यावर राहूल गांधीनीही मागील काही दिवसांपासून ट्विटरवर एक व्हिडिओची मालिका सुरू केली आहे. यामध्ये राहूल गांधींनी मोदी सरकारवर सडकून टिका केली आहे. आता  राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनीही बिहार राज्य सरकारचा निषेध करण्याची एक नवीन शक्कल लढवली आहे. तेजस्वी यादव यांनी बिहारच्या नागरिकांना बुधवारी रात्री 9 वाजता घराच्या बाल्कनीत किंवा घराच्या बाहेर दीवे, मेणबत्त्या आणि कंदील प्रज्वलित करण्याचे आवाहन केलं आहे. बिहारमधील वाढती बेरोजगारी आणि  बिहार राज्य सरकार करत असलेलं खाजगीकरण याच्या निषेधासाठी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांनी बिहारी जनतेला आवाहन केले आहे.

सुरुवातीला तेजस्वी यादव यांनी राजद पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांना गरिब जनतेला आणि बेरोजगार तरुणांच्या  पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. सध्या देशासह बिहारच्या बेरोजगार तरुणांच्या समर्थनार्थ मी आणि माझी आई राबड़ी देवी  रात्री 9 वाजता माझ्या घराच्या गच्चीवर कंदील लावणार असल्याचं, बुधवारी सकाळी तेजस्वी यांनी ट्विट करुन सांगितलं आहे.

हे वाचा - सहा वर्षांत गरीबांसाठी प्रचंड काम केलं- नरेंद्र मोदी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांपूर्वी पक्ष तरुणांच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करत आहे. यादव यांनी 5 सप्टेंबर रोजी बेरोजगार तरुणांचा डेटाबेस तयार करण्यासाठी ‘www.berozgarihatao.co.in’ पोर्टल आणि एक टोल फ्री क्रमांकही सुरू केला होता, ज्यांना त्यांचा पक्ष राज्यात सत्तेत आला तर नोकरी करण्याचे वचन दिले आहे.

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी 7 सप्टेंबर रोजी आपल्या पक्षाच्या (संयुक्त जनता दल) नवीन डिजिटल प्लॅटफॉर्म ‘jdulive.com’ च्या माध्यमातून रॅलीला संबोधित करतांना म्हटले होते की, त्यांच्या सरकारने ऑक्टोबर, 2018 पर्यंत राज्यातील प्रत्येक घरात वीज जोडणी दिली आहे. कुमार म्हणाले की, लोकांना दररोज २२ तास वीजपुरवठा होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tejaswi Yadav calls for lights against Bihar government