Bihar Election - तेजस्वींनी वापरला राज ठाकरे पॅटर्न; शेअर केला मोदींचा जुना व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

विरोधी आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींच्या खांद्यावर बंदुक ठेवून नितीश कुमार यांच्यावर अचूक निशाणा साधला आहे.

पाटणा : बिहार विधानसभेची रणधुमाळी ऐनभरात आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. निवडणुकत सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बिहारच्या रणसंग्रामात उतरलेले सगळेच पक्ष कधी ना कधी एकमेकांचे सहकारी राहीलेले आहेत. सत्तेसाठी कधी मित्रत्व तर कधी विरोधक अशी भुमिका सातत्याने या पक्षांकडून घेतली जात आहे. मागच्या निवडणुकीत विरोधक असणारे पक्ष आता एकत्र लढत आहेत तर ज्यांच्यासोबत मागच्यावेळी सत्ता मिळवली ते आता विरोधात उभे ठाकले आहेत. यामुळे मागची वक्तव्ये पुन्हा नव्याने बाहेर काढून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीवेळी महाराष्ट्रात 'लाव रे तो व्हिडीओ' असं म्हणत अनेक जुने आणि भाजपची पोलखोल करणारे व्हिडीओ प्रचारसभांमध्ये दाखवले होते. याच प्रकारचा काहीसा अवलंब करत आता तेजस्वी यादव यांनीही नितीश कुमारांवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा - Bihar Election - मोफत लसीच्या आश्वासनाने आचारसंहितेचा भंग झाला का? निवडणूक आयोगानं दिलं उत्तर

बिहार विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी चार प्रचारसभांना उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवरच विरोधी आघाडीचे नेते तेजस्वी यादव यांनी मोदींच्या खांद्यावर बंदुक ठेवून नितीश कुमार यांच्यावर अचूक निशाणा साधला आहे. 2015 साली नितीश कुमारांनी राजद-काँग्रेससोबत आघाडी करत निवडणुक लढवली होती. तेंव्हा पंतप्रधान मोदींनी नितीश कुमारांवर लावलेल्या आरोपांचा एक व्हिडीओ तेजस्वी यादव यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. सध्या नितीश कुमार भाजपसोबत एनडीएकडून ही निवडणुक लढवत आहेत. 

हा व्हिडीओ अवघ्या दिड मिनिटांचा असून यामध्ये एका प्रचारसभेत नुकतेच पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी नितीश कुमारांनी बिहारमध्ये केलेल्या घोटाळ्यांची यादी वाचताना दिसत आहेत. तेजस्वी यादवांनी हा व्हिडीओ ट्विट करुन म्हटलंय की, आदरणीय नितीशजींच्या शासनकाळात आतापर्यंत 30 हजार कोटीचे 60 मोठे घोटाळे झाले आहेत. यामधील 33 घोटाळे तर माननीय पंतप्रधान मोदी स्वत:च ऐकवत आहेत. स्वत:चं ऐका... यानंतर सृजन घोटाळा, धान्य घोटाळा, शौचालय घोटाळा, छात्रवृत्ती घोटाळ्यासहीत हजारो कोटींचे इतर घोटाळे झाले आहेत. 

हेही वाचा - भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामागे ‘तैय्यबा’

तेजस्वी यादवांचे म्हणणे आहे की, या मोदींच्या भाषणानंतरही अनेक घोटाळे समोर आले आहेत. जसे की सृजन घोटाळा आणि धान्य घोटाळा. यादरम्यानच शुक्रवारी पाटण्यामध्ये आयकर विभागाने केलेल्या छापेमारीमध्ये अनेक अशा व्यापारांकडे नगदी आणि महत्वाचे कागद मिळाले आहेत, जे सरकारी जल-नल योजनेचे काम करतात. यामुळे विरोधकांना आपसुकच एक मुद्दा मिळाला आहे. 

लोकजनशक्ती पार्टीच्या चिराग पासवान यांनीदेखील याआधी योजनांमध्ये झालेल्या घोटाळ्यांवर तपास करण्याचे आश्वासन दिले होते. बिहरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 व 7 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीचा निकाल 10 नोव्हेंबर रोजी लागणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tejaswi yadav shared old vedio of narendra modi alleging nitish kumar for corruption