भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामागे ‘तैय्यबा’

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामच्या एका गावात दहशतवाद्यांकडून तीन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केल्याची घटना काल समोर आली होती.

श्रीनगर, ता.३० (पीटीआय) : जम्मू आणि काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये तीन भाजप नेत्यांच्या झालेल्या हत्येमध्ये लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेचाच हात असल्याची माहिती पोलिस महानिरीक्षक विजयकुमार यांनी दिली. खोऱ्यातील संरक्षणप्राप्त व्यक्तींनी सुरक्षेशिवाय बाहेर फिरू नये अशी सूचनाही त्यांनी केली आहे. फिदा हुसैन, उमर हाजम आणि उमर बेग असे मरण पावलेल्या भाजप कार्यकर्त्यांची नावे आहेत. दक्षिण काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील वाय.के. पोरा भागामध्ये गुरुवारी सायंकाळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. लष्करे तैय्यबाचीच शाखा असणाऱ्या दि रेझीस्टन्स फ्रंटने (टीआरएफ) या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांकडून वापरण्यात आलेली शस्त्रे आणि वाहने देखील पोलिसांनी जप्त केली आहेत.

हेही वाचा - कमलनाथ यांना आयोगाचा दणका

जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामच्या एका गावात दहशतवाद्यांकडून तीन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केल्याची घटना काल समोर आली होती. याबाबतची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी आपल्या एका वक्तव्यात म्हटलं होतं की, जवळपास 8 वाजून 20 मिनिटांनी कुलगाम पोलिसांना पोरा गावांत एक दहशतवादी घटना घडल्याची माहिती त्यांना मिळाली. यामध्ये दहशतवाद्यांनी तीन भाजप कार्यकर्त्यांवर गोळीबार केल्याची घटना घडली होती. या हल्ल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोहोचले. उपचारासाठी या तिघांना त्यांनी जवळच्या एका दवाखान्यात नेलं होतं मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

हेही वाचा - धक्कादायक! अमेठीत दलित गाव प्रधानाच्या पतीला जाळले जिवंत

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. त्यांनी ट्विट करुन या घटनेची निंदा केली आहे. मी तीन कार्यकर्त्यांच्या हत्येचा निषेध करतो. जम्मू काश्मीरमध्ये उत्कृष्ट काम करणारे ते तीघेही प्रतिभावान कार्यकर्ते होते. अशा दु:खाच्या समयी मी त्यांच्या परिवारासोबत आहे. त्यांच्या आत्म्याला चिर:शांती लाभो.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: J&K three bjp workers killed by lashkar e toiba