काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात तीन जवान हुतात्मा

वृत्तसंस्था
बुधवार, 12 जून 2019

दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान हुतात्मा झाले. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग बस स्थानकाजवळ दहशतवाद्यांनी आज (बुधवार) केलेल्या हल्ल्यात तीन जवान हुतात्मा तर पाच जवान गंभीर जखमी झाले आहेत. यावेळी एका दहशतावाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्याप्रमाणात गोळीबार सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतनाग येथील केपी रोडवर सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबाराला सीआरपीएफच्या जवानांनी प्रत्युत्तर देत एका दहशतवाद्याला ठार केले. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात सीआरपीएफचे तीन जवान हुतात्मा झाले. पाच जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्याप चकमक सुरु आहे.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम शाहबाग लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा केला होता. या वर्षाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत सुरक्षा दलांनी 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे पाकिस्तानने सोमवारी (ता. 10) शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यावेळी एक जवान हुतात्मा झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terror attack in J&Ks Anantnag 2 CRPF soldier martyred and 5 injured