Terrorism Fund : दहशतवादाला आर्थिक रसदीमुळे बळ; अजित दोवाल

दोवाल ; मध्य आशियायी देशांनी पुढाकार घ्यावा
Terrorism fueled by financial logistics Ajit Doval National Security of India and Central Asian Countries
Terrorism fueled by financial logistics Ajit Doval National Security of India and Central Asian Countriessakal

नवी दिल्ली : आर्थिक रसदीमुळेच दहशतवादी कारवायांना बळ मिळते त्यामुळे आधी ही रसद तोडण्याला प्राधान्य द्यायला हवे, असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित दोवाल यांनी आज मांडले. काही महत्त्वाच्या प्रादेशिक सुरक्षाविषयक आव्हानांचा सामना करण्यासाठी मध्य आशियायी देशांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. भारत आणि मध्य आशियायी देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या संमेलनाच्या उद् घाटनप्रसंगी ते बोलत होते. परस्परांना जोडणाऱ्या प्रकल्पांची उभारणी करत असताना त्या देशांचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक सर्वसमावेशकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. चीनच्या ‘बेल्ट आणि रोड’ उपक्रमावर होत असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे मत मांडले.

मध्य आशिया हा भारताचा एक विस्तारित शेजारी असून आमचे याच भागाला अधिक प्राधान्य आहे. अफगाणिस्तानचा विषय आज आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचा आहे, असेही त्यांनी नमूद केले. अफगाणिस्तानसह अन्य देशांतील वाढलेल्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर परस्परांमधील सुरक्षा सहकार्य वाढविण्यासाठी एक सामाईक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तत्पूर्वी जानेवारीमध्ये झालेल्या पहिल्या भारत- मध्य आशिया संमेलनातील काही निर्णयांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने देखील या संमेलनात विचारमंथन होणे अपेक्षित आहे.

शांत मध्य आशिया हिताचा

सध्या आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये मोठी घुसळण होऊ लागली असून भविष्याबाबत देखील अनिश्चितता निर्माण झाली आहे. शांत, सुरक्षित आणि उन्नत मध्य आशिया आपल्या सर्वांच्याच हिताचा असून परस्परांतील सहकार्य आणि समन्वय वाढविण्यासाठी आजचे संमेलन महत्त्वपूर्ण ठरणार आहे असे दोवाल यांनी स्पष्ट केले. दोवाल यांच्या भाषणामध्ये दहशतवादामुळे निर्माण झालेली आव्हाने, अफगाणिस्तानातील परिस्थिती आणि प्रादेशिक दळणवळण प्रकल्प हे तीन मुद्दे केंद्रस्थानी होते.

दहशतावादावर चिंता

अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर जैशे मोहंमद आणि लष्करे तैय्यबासारख्या पाकिस्तानातील संघटना त्यांच्या कारवायांसाठी करत आहेत, भारताला याचीच चिंता आहे असेही दोवाल यांनी सांगितले. या बैठकीला कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि तुर्कमेनिस्तानचे भारतातील राजदूत देखील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com