दहशतवाद्यांचा कट उधळला

पीटीआय
Friday, 17 January 2020

 प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे, "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेच्या हिंसक षड्‌यंत्राचा पर्दाफाश करत आज काश्‍मीर खोऱ्यामध्ये पाचजणांना अटक करण्यात आली.

श्रीनगर  - प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरक्षा दलांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे, "जैशे महंमद' या दहशतवादी संघटनेच्या हिंसक षड्‌यंत्राचा पर्दाफाश करत आज काश्‍मीर खोऱ्यामध्ये पाचजणांना अटक करण्यात आली. श्रीनगरमध्ये याआधी झालेल्या हिंसक घटनांमध्येही या दहशतवाद्यांचा हात होता, असा दावा पोलिसांनी केला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सुरक्षा दले आणि पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठा शस्त्रसाठाही जप्त केला असून, त्यामध्ये जिलेटिनच्या कांड्या, स्फोटके, डिटोनेटर्स, शस्त्रे, बॅटरी आणि नायट्रिक ऍसिड आदी घटकांचा समावेश आहे. सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांची कसून चौकशी केली असता त्यांनीच आपण कोठे शस्त्रे दडवून ठेवली याची माहिती तपास अधिकाऱ्यांना दिली, यानंतर काही ठिकाणांवर छापेही घालण्यात आले होते. अटक केलेले पाचही दहशतवादी जैशे महंमद या संघटनेशी संबंधित असून, याआधी खोऱ्यामध्ये झालेल्या हिंसाचारात त्यांचा सक्रिय सहभाग होता, असे काश्‍मीर विभागाचे पोलिस उपसंचालक व्ही. के. बिर्दी यांनी सांगितले. आयईडी स्फोटकांच्या माध्यमातून दहशतवादी हल्ला घडविण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टप्प्यांत कारवाई करत या सर्वांच्या मुसक्‍या आवळल्या आहेत. 

ग्रेनेड हल्ल्यामुळे.. 
हजरतबाल परिसरामध्ये हबाक क्रॉसिंग जवळ 8 जानेवारी रोजी ग्रेनेड हल्ला झाला होता. यामध्ये काही नागरिक जखमी झाले होते. या घटनेची पोलिसांनी चौकशी करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले होते. पेशाने चालक असणारा एजाज अहमद शेख आणि स्थानिक विक्रेता उमर हमीद शेख या दोघांच्या मुसक्‍या पोलिसांनी आवळल्या होत्या. हे दोघेही हजरतबाल परिसरात राहतात. 

काश्‍मीर विद्यापीठाजवळ केला होता हल्ला 
या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांनी मागील वर्षी 26 नोव्हेंबर रोजी अशाचप्रकारचा हल्ला काश्‍मीर विद्यापीठाजवळ घडवून आणल्याची कबुली दिली होती. यानंतर सुरक्षा दलांनी अन्य काही ठिकाणांवर छापे घालत आणखी तिघांना ताब्यात घेतले होते. यामध्ये इम्तियाझ अहमद चिकला ऊर्फ इमरान, साहील फारूख गोजरी आणि नासीर मीर यांचा समावेश आहे. हे तिघेही हजरतबालचेचे रहिवासी आहेत. श्रीनगर शहरात दहशवादी हल्ला घडवून तणाव निर्माण करणे, संवेदनशील स्थळांवर बॉंबस्फोट घडवून आणणे असे कट त्यांनी आखले होते, असेही बिरदी यांनी सांगितले. 

कठोर कारवाई आवश्‍यक : रावत
नवी दिल्ली :
दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या देशांविरोधात जागतिक पातळीवरून कठोर कारवाई होणे आवश्‍यक आहे, असे मत भारताचे सरसेनाध्यक्ष बिपीन रावत यांनी आज व्यक्त केले. अवघड स्थितीशी दोन हात करीत समस्येच्या मुळावरच घाव घालणे गरजेचे असल्याचे रावत ‘रायसीना चर्चे’वेळी म्हणाले. ‘दहशतवादाविरोधात अमेरिकेप्रमाणे खंबीर भूमिकाच आवश्‍यक आहे. जोपर्यंत दहशतवादाला पाठीशी घालणारे देश आहेत तोपर्यंत आपल्याला या समस्येशी झगडत राहावेच लागेल. त्यामुळे मुळावरच घाव घालणे आवश्‍यक आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terrorists arrested in Srinagar