दहशतवाद्यांकडे अमेरिकी उपकरणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

terrorists using American equipment Evidence military being used infiltration
दहशतवाद्यांकडे अमेरिकी उपकरणे

दहशतवाद्यांकडे अमेरिकी उपकरणे

श्रीनगर : अफगाणिस्तानमधील संघर्षावेळी अमेरिकेच्या सैनिकांनी वापरलेली काही उपकरणे काश्‍मीर खोऱ्यात वापरात असल्याचे काही पुरावे दिसून आल्याचे भारतीय लष्करारर्फे आज सांगण्यात आले. ही उपकरणे तालिबानी दहशतवाद्यांमार्फत काश्‍मीरमध्ये आली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांकडे इरिडियम सॅटेलाइट फोन आणि ‘थर्मल इमेजरी’ उपकरणे असल्याचे आढळून आले आहे. सुरक्षा दलांच्या सायबर सुरक्षा विभागाला याचे काही पुरावे आढळून आले आहेत.

दोन महिन्यांपासून इरिडियम सॅटेलाइट फोनचा वापर केला जात आहे. अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये असताना या फोनचा वापर केला जात होता. अमेरिकी सैन्याने मायदेशी परत जाताना अनेक उपकरणे काबूल विमानतळावरच सोडून दिली होती. हीच उपकरणे तालिबानच्या हाती लागली असावीत किंवा त्यांनी ती संघर्षादरम्यान अमेरिकी सैनिकांकडून हिसकावून घेतली असावीत, असे भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या फोनचा काश्‍मीर खोऱ्यात होत असलेला वापर ही चिंतेची बाब नाही. फोनच्या वापरावर सायबर सुरक्षा विभागाची नजर असून लवकरच हा वापर करणारे तुरुंगात असतील, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

रात्रीच्या अंधारात घुसखोरी

वाय-फायला जोडता येणाऱ्या थर्मल इमेजरी उपकरणांचा दहशतवाद्यांकडून वापर होत असल्याचे आढळून आले आहे. रात्रीच्या वेळी घुसखोरी करण्यासाठी या उपकरणाचा वापर होत असल्याचा अंदाज आहे. परिसरात असलेल्या व्यक्तीच्या शरीरातील तापमानाला हे उपकरण संवेदनशील असते. त्यामुळे दहशतवाद्यांना रात्रीच्या अंधारातही त्यांच्याजवळ येणाऱ्या सुरक्षा जवानांचा अंदाज येतो आणि त्यांच्यापासून दूर पळून जाता येते. दहशतवाद्यांना या उपकरणाचा वापर करता येऊ नये म्हणून गस्त घालणारे जवान आता आपल्या बरोबर जॅमर बाळगत आहेत. त्यामुळे हे उपकरण वाय-फायला जोडता येत नाही आणि त्याचा वापर करता येत नाही.

Web Title: Terrorists Using American Equipment Evidence Military Being Used Infiltration

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..