esakal | राजधानी दिल्लीवर वीजसंकटाचे सावट | New Delhi
sakal

बोलून बातमी शोधा

delhi

राजधानी दिल्लीवर वीजसंकटाचे सावट

sakal_logo
By
सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कोरोना लाटेत ऑक्सिजन टंचाईचे प्राणघातक संकट झेलणाऱ्या राष्ट्रीय राजधानी दिल्लीवर आता गंभीर वीज संकटाचे सावट आलेे. केवळ एका दिवसाचा कोळसा शिल्लक असल्याने दिल्लीत विजेची गंभीर टंचाई जाणवू शकते, असा इशारा टाटा पॉवरने दिल्लीतील ग्राहकांना पाठवला आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून अंधार-संकटात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पुढच्या एखाद्या दिवसातच दिल्लीत दुपारी २ ते सायंकाळी ७ असे भारनियमन लावावे लागेल अशी चिन्हे आहेत.

कोळसा उत्पादनाच्या बाबतीत जगातील चौथा प्रमुख देश असणाऱ्या भारतावरच वीजसंकट जाणवत आहे. देशातील कोळशावर चालणाऱ्या किमान १३५ वीजनिर्मिती केंद्रांपैकी १०७ केंद्रांमध्ये फक्त ५ दिवस पुरेल इतका तर अन्य २८ वीज निर्मिती केंद्रात फक्त २ दिवस पुरेल इतका कोळसा आहे. सप्टेंबर महिन्यात देशात झालेल्या सरासरीपेक्षा २७ टक्के जास्त पावसामुळे भारतातील अनेक कोळसा खाणींमध्ये पाणी शिरले. त्यामुळे बहुतांश प्रमुख वीज प्रकल्पांमध्ये कोळशाचा तुटवडा निर्माण झाला आहे.

अखंडित वीजपुरवठ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीला वीज पुरवठा करणाऱ्या वीज प्रकल्पामध्ये कोळशाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. येथे केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे दिल्लीतील वीज ग्राहकांसोबत प्रशासनाची चिंता वाढली आहे.

केजरीवाल यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

दिल्लीतील संभाव्य वीज संकटाबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. त्यात म्हटले आहे, की परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. मात्र कोळसा टंचाई गंभीर पातळीवर पोचली. वीजसंकटापासून दिल्लीला वाचविण्यासाठी कोळसा बवाना वीजनिर्मिती केंद्राला उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली आहे.

loading image
go to top