काँग्रेसविना तिसऱ्या आघाडीचा कोणताही विचार नाही - माजीद मेमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP leader Majeed Memon

काँग्रेसविना तिसऱ्या आघाडीचा कोणताही विचार नाही - माजीद मेमन

नवी दिल्ली : दिल्लीत शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी १५ प्रमुख विरोधीपक्षांची बैठक संपली. तब्बल अडीच तास चाललेल्या या बैठकीत नक्की कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीद मेमन यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच काँग्रेसला वेगळं पाडून तिसरी आघाडी (Third front) निर्माण करण्याचा या बैठकीचा कुठलाही हेतू नव्हता असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. (There is no idea of a third front without Congress says MP Majid Memon)

मेमन म्हणाले, माध्यमांमध्ये गेल्या २४ तासांपासून ज्या बातम्या येत आहेत. त्यावर खुलासा करणं गरजेचं आहे. भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी शरद पवारांनी ही बैठक बोलावली होती, असं माध्यमांमधून सांगितलं जात होतं. मात्र, असं काहीही नव्हतं कारण ही बैठक शरद पवार यांच्या निवासस्थानी झाली असली तरी ही बैठक शरद पवारांनी बोलावली नव्हती. तर राष्ट्रमंचचे प्रमुख यशवंत सिन्हा यांनी बोलावली होती. त्यामुळे राष्ट्रमंचचे आम्ही सर्व संस्थापक सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मिळून या बैठकीचं आयोजन केलं होतं.

दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसला वगळून शरद पवारांकडून एक मोठ राजकीय पाऊल उचललं जात आहे, अशा वावड्याही उठल्या होत्या. मात्र, ही चर्चा चुकीची असून आम्ही कुठलाही राजकीय भेदभाव केलेला नाही. आम्ही या बैठकीला त्या सदस्यांना बोलावलं आहे जे राष्ट्रमंचची विचारधारा मानणारे आहेत. यामध्ये सर्व राजकीय पक्षांचा समावेश आहे. यामध्ये कोणत्याही राजकीय मतभेदाचा प्रश्न नव्हता. काँग्रेसच्या सदस्यांना मी स्वतः या बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. यामध्ये विवेक तन्खा, मनिष तिवारी, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी आणि शत्रुघ्न सिन्हा या खासदारांचा निमंत्रित करण्यात आलं होतं. पण काही कामानिमित्त ते या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे काँग्रेसवर बहिष्कार टाकून तिसरी आघाडी स्थापनाचा या बैठकीचा कुठलाही प्रयत्न नव्हता, असंही यावेळी माजित मेमन यांनी स्पष्ट केलं.

आजच्या बैठकीत देशात सध्या जे आर्थिक आणि समाजिक वातावरण बिघडलं आहे ते व्यवस्थित करण्यामध्ये राष्ट्रमंचची काय भूमिका असेल यावर चर्चा झाली. यामध्ये राजकीय पक्षांसह बिगर राजकीय व्यक्ती देखील समाविष्ट झाल्या होत्या. यामध्ये जावेद अख्तर, न्या. ए. पी. शहा यांचाही समावेश होता. त्यामुळे या बैठकीला राजकीय बैठक माननं चुकीचं असेल, असंही मेमन यावेळी म्हणाले.

दरम्यान, समाजवादी पार्टीचे नेते घनश्याम तिवारी यावेळी म्हणाले, "राष्ट्रमंचची ही पहिली बैठक होती. ज्याची संपूर्ण देशात चर्चा झाली. पक्षांच्या मुद्द्यांपेक्षा वर येऊन देशासाठी सर्वजण एकत्र आले होते. या देशात एक पर्यायी दृष्टीकोन तयार केला जावा, एक असा विचार तयार व्हावा जो या देशातील ज्वलंत मुद्द्यांवर भाष्य करेल, असं या बैठकीतील चर्चेच सार असं होतं."