राजधानीलाही टोळधाडीचा धोका; इतर राज्यांमध्येही दक्षतेचा इशारा 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 मे 2020

राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठ आता टोळधाड दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

नवी दिल्ली - कोरोनाचे संकट अद्याप संपले नसताना टोळधाडीने नवा उच्छाद घातला आहे. राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब पाठोपाठ आता टोळधाड दिल्लीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब, हरियाना या राज्यांमध्ये दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

टोळधाडीचा सीमेलगच्या राज्यात उपद्रव सुरू आहे. आतापर्यंत राजस्थानपुरता मर्यादीत राहणारी टोळधाड अन्य राज्यांमध्येही पसरत असल्याने धास्ती वाढली आहे. शेजारच्या पंजाबमध्ये देखील यंदा टोळधाडीने थैमान घातले आहे. मध्य प्रदेशात उपद्रव सुरू असून टोळधाड महाराष्ट्रात विदर्भाकडे वळण्याचीही शक्यता आहे. या धाडीत असंख्य टोळ शेतातील उभी पिके फस्त करत असल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत. राजस्थानमार्गे आक्रमण झालेल्या टोळधाडीवर उपाययोजनांसाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू असल्या तरी लॉकडाउनमुळे त्यात अडथळे येत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातदेखील टोळधाडीचे संकट उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यापार्श्वभूमीवर दिल्लीचे श्रममंत्री गोपाल राय यांनी आज उपाययोजनाच्या तयारीची बैठक घेतली. तसेच दिल्ली सरकारने याबाबतची मार्गदर्शक सूचनावली देखील जाहीर केली आहे. करवतीसारखे दात असलेल्या टोळांच्या कचाट्यातून पिकेच नव्हे तर झाडेझुडपे देखील वाचण्याची शक्यता कमी असते. साहजिकच, टोळधाड आल्यास दिल्लीतील वृक्षराजीची हानी होण्याची चिंता सरकारपुढे आहे. 

सर्वेक्षण केंद्र स्थापन 
राजस्थानच्या अजमेर, चितौडगड, दौसा तर मध्य प्रदेशातील मंदसौर, उज्जैन, शिवपुरी आणि उत्तर प्रदेशातील झाशी येथे सर्वेक्षण आणि उपायोजनेसाठी २०० अस्थायी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये टोळधाड नियंत्रण मोहिमेला गती देण्यात आली असून या तीन राज्यांमध्ये ४७,३०८ हेक्टरवर किटकनाशकांची फवारणी करण्यासाठी अग्निशमन दलाचे ८९ बंब तैनात करण्यात आले आहेत. याखेरीज फवारणीसाठी ८१० ट्रॅक्टर, ४७ इतर वाहने, १२० सर्वेक्षण वाहनांचाही वापर केला जात आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी ६ मेस बैठक घेऊन राज्यांना जागरुक राहण्यास तसेच किटकनाशक उत्पादकांनाही तयारीत राहण्यास सांगितले होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threat of insect-locust in new delhi; alert in other states as well