तीन भारतीयांची मुक्तता

पीटीआय
Tuesday, 8 October 2019

अफगाणिस्तानबरोबर संपर्क
भारतीय अभियंत्यांच्या बदल्यात तालिबान्यांची सुटका केल्याचे वृत्ताविषयी कळाले आहे. या संदर्भात अफगाणिस्तानबरोबर संपर्कात असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले. या वृत्ताबाबत दुजोरा मिळाल्यानंतर माहिती देण्यात येईल, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले.

इस्लामाबाद - अफगाणिस्तानमधील ‘तालिबान’ या दहशतवादी संघटनेने त्यांच्या ११ साथीदारांच्या बदल्यात तीन भारतीय अभियंत्यांची सुटका केली आहे. या घटनेत अफगाणिस्तानशी संपर्कात असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले. 

अफगाणिस्तानमध्ये समेटासाठी नियुक्त केलेले अमेरिकेचे खास प्रतिनिधी झाल्मे खलिलझाद आणि अब्दुल घनी बरादर यांच्या नेतृत्वाखालील तालिबानच्या प्रतिनिधींमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर पाचपैकी तीन भारतीय ओलिसांची सुटका करण्यात आली. अफगाणिस्तानच्या तुरुंगातून तालिबानचे जे ११ दहशतवादी सोडण्यात आले त्यात काही उच्चपदस्थांचा समावेश आहे. ही अदलाबदल रविवारी (ता. ६) झाली. 

तालिबानच्या दोन अधिकाऱ्यांनी काल याबाबत ‘रेडिओ फ्रि युरोप/रेडिओ बिलर्टी’ला ही माहिती दिली. मात्र, त्यांचे ठिकाण मात्र त्यांनी उघड केलेले नाही. हा विषय संवेदनशील असल्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर तालिबानच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली, असे ‘एक्‍सप्रेस ट्रिब्युन’च्या वृत्तात म्हटले आहे. याबाबात अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांकडून काहीही मत व्यक्त करण्यात आलेले नाही. 

गेल्या वर्षी झाले अपहरण
अफगाणिस्तानमधील उत्तर बागलान प्रांतातील ऊर्जा प्रकल्पात काम करणाऱ्या सात भारतीय अभियंत्यांचे मे २०१८मध्ये तालिबान संघटनेने अपहरण केले होते. या अपहरणाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारली नव्हती. यापैकी एकाची मार्चमध्ये सुटका झाली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three Indian realease by taliban terrorist organisation