esakal | जैशे मोहोम्मदचे तीन दहशतवादी ठार 
sakal

बोलून बातमी शोधा

जैशे मोहोम्मदचे तीन दहशतवादी ठार 

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते.पण त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला.प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली

जैशे मोहोम्मदचे तीन दहशतवादी ठार 

sakal_logo
By
पीटीआय

श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्राल भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत जैशे मोहोम्मदचे तीन दहशतवादी ठार झाल्याची माहिती लष्करी सूत्रांनी बुधवारी दिली. दरम्यान, चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये एक जैशे मोहोम्मदचा ऑपरेशनल कमांडर आणि अव्वल बॉम्ब-निर्माता अब्दुल रहमान ऊर्फ ​​'फौजी भाई' असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या विषयी बोलताना जम्मू आणि काश्मिरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार म्हणाले, की चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमधील अब्दुल रहमान हा पाकिस्तानी नागरिक असून तो एक अव्वल बॉम्ब निर्माता होता. तो २०१७ पासून या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता आणि अफगाणिस्तानातील दहशतवादी कारवायांमध्येही तो सामील होता. तसेच २८ मे रोजी पुलवामामध्ये स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. त्या कटामध्येही रहमान सहभागी होता अशी माहिती कुमार यांनी यावेळी दिली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर बुधवारी सकाळी जम्मू-काश्मीर पोलीस, भारतीय लष्कर आणि सीआरपीएफच्या जवानांनी ही संयुक्त कारवाई केली. माहितीच्या आधारावर सापळा रचून दहशतवाद्यांना घेरण्यात आले होते. यावेळी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत हे तिन्ही दहशतवादी ठार झाले अशी माहिती लष्कराच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. 

पुलवामा हल्ल्यात सहभागाचा संशय 
पुलवामा येथे २०१९मध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अब्दुल रहमान ऊर्फ ​​'फौजी भाई'चा सहभाग होता की नाही याची खात्री नसली तरी तो यावेळी या भागातील दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होता अशी माहिती पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली आहे.