'सीरम' लसीचे तीन ट्रक पहाटे रवाना; पुण्यातून देशभरात होणार वितरण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 12 January 2021

येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

पुणे : कोरोना प्रतिबंधक लस खरेदीची पहिली ऑर्डर "सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'कडे (एसआयआय) केंद्र सरकारने नोंदविली आहे. एक कोटी दहा लाख लसीच्या डोसचा हा खरेदी आदेश असून, आज मंगळवारी सकाळपासून ही लस महाराष्ट्रासह देशाच्या वेगवेगळ्या राज्यांसाठी पुण्यातून रवाना केली गेली आहे. या एका लसीच्या डोसची किंमत 200 रुपये निश्‍चित करण्यात आली आहे.  पुणे एअरपोर्टवरुन आठ विमानांद्वारे कोरोना लस देशातील 13 ठिकाणी पाठवली जाईल. पहिले विमान दिल्लीसाठी रवाना होणार आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.

एअर इंडिया, स्पाईसजेट, इंडीगो या एअरलाईन्सच्या माध्यमातून पुण्यातून 56.5 लाख लसीचे खुराक दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवाहटी, शिलाँग, अहमदाबाद, हैद्राबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटना, बेंगलुरु, लखनऊ आणि चंदिगढ येथे रवाना झाले आहेत. याबाबतची माहिती केंद्रीय नागरी हवाई उड्डाण मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे.

"ऑक्‍सफर्ड युनिव्हर्सिटी' आणि "ऍस्ट्राझेनेका' यांनी विकसित केलेल्या आणि पुण्यातील "एसआयआय'मध्ये उत्पादित "कोव्हिशिल्ड' लसीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारच्या "सेंट्रल ड्रग्ज स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन"ने (सीडीएससीओ) एक जानेवारीला परवागनी दिली होती. त्यानंतर बरोबर दहा दिवसांनी कोव्हिशिल्ड लसीच्या खरेदी पहिली खरेदी ऑर्डर "एसआयआय'ला मिळाली. केंद्राने 22 कोटी डोस खरेदी करण्याबद्दल चर्चा झाली होती. पहिल्या टप्प्यात एक कोटी 10 लाख लसीचे डोस खरेदी करण्याचा येत असल्याची माहिती "एसआयआय'च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कोरोना योद्‌ध्यांना ही लस दिली जाईल. त्यात डॉक्‍टर, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यापासून ते रुग्णालयात काम करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा समावेश आहे. केंद्रातर्फे ही लस खरेदीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. 

हेही वाचा - "सीरम'ला लसीची पहिली "ऑर्डर'; एक कोटी दहा लाखडोस पुरविणार

पुण्यातून देशभरात वितरण 
कोरोना विषाणूंच्या संसर्गाला प्रतिबंधित करणारी कोव्हॅक्‍सिन लस पुण्यात उत्पादित करण्यात आली आहे. त्यामुळे देशातून सर्व शहरांना ही लस पुण्यातून वितरित केली जाईल. त्यासाठी पूर्व, पश्‍चिम, दक्षिण आणि उत्तर या दिशांप्रमाणे वर्गवारी केली आहे. या लस वितरणाच्या मुख्य केंद्रापर्यंत लस वितरणासाठी 12 ते 10 कोल्ड स्टोअरेज ट्रक सज्ज ठेवले आहेत. केंद्राचा आदेश मिळताच हे ट्रक आकुर्डीवरून हडपसर येथील सीरम इन्स्टिट्युटमध्ये गेले. तेथे ट्रकमध्ये लसीचे डोस अपलोड होतील. त्यानंतर ते विमानतळावर जातील, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार, आज हे तीन ट्रक रवाना झाले आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three trucks carrying Covishield vaccine reached Pune airport from Serum Institute of India