
नवी दिल्ली : ‘‘कमल हसन यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘ठग लाईफ’ चित्रपटावर कोणतीही बंदी अथवा निर्बंध घातले जाणार नाही,’’ असे आश्वासन कर्नाटक सरकारकडून आज सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आले. या आश्वासनानंतर या चित्रपटाच्या कर्नाटकातील प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला. कन्नड भाषेचा उगम तमीळ भाषेतून झाल्याचे विधान हसन यांनी केले होते. त्यानंतर कर्नाटकातील जनतेत रोष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर ‘ठग लाइफ राज्यात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका विविध संघटनांनी घेतली होती.