पूरग्रस्तांवर उंदीर खाण्याची वेळ

वृत्तसंस्था
बुधवार, 17 जुलै 2019

बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. 

कटिहार (बिहार) -  बिहारमधील पुराच्या थैमानामुळे कटिहार जिल्ह्यातील डांगी टोलाच्या रहिवाशांवर उंदीर खाऊन गुजराण करण्याची वेळ आली आहे. सुमारे ३०० कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे. 

‘आमची घरे पुरात उद्‌ध्वस्त झाली असून, पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे उंदीर खाऊन जगावे लागत आहे. पाण्यामुळे उंदीर बाहेर आले असल्याने तेच खावे लागत आहे,’ असे तल्ला मुरमूर या स्थानिक नागरिकाने सांगितले. मात्र, स्थानिक नागरिकांच्या या समस्येची कल्पना नसल्याचे कडवाचे मंडळ विकास अधिकारी राकेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याबाबत आपण मुख्यमंत्री नितीशकुमार यांना पत्र पाठविल्याची माहिती काँग्रेसचे आमदार शकील अहमद खान यांनी दिली. 

पुरात २५ मृत्युमुखी
बिहारमध्ये आत्तापर्यंत पुरात २५ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज दिली. राज्यात १६ जिल्ह्यांमधील २५.७१ लाख जणांचा पुराचा फटका बसला असून, सव्वा लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती निवारण दलांची एकूण २६ पथके तैनात असून, त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू आहे. पूरग्रस्तांसाठी १९९ मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Time to eat rats on flood victims