esakal | आता घरातही मास्क वापरण्याची आली वेळ - नीती आयोग

बोलून बातमी शोधा

Mask
आता घरातही मास्क वापरण्याची आली वेळ - नीती आयोग
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : देशात सातत्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येवर भाष्य करताना केंद्रानं नागरिकांना एक महत्वाचा सल्ला दिला आहे. आता आपल्या घरांमध्ये कुटुंबियांसमवेत असतानाही मास्क वापरण्याची वेळ आली आहे, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी म्हटलं आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पॉल म्हणाले, "कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात थैमान घातलं आहे, या काळात विनाकारण घराबाहेर पडू नका. इतकचं नव्हे आता तर घरात कुटुंबियांसमवेत असतानाही मास्क लावण्याची वेळ आली आहे. मास्क लावणं खूप महत्वाचं आहे. लोकांना तुमच्या घरी बोलवू नका. सध्याच्या वाढत्या संसर्गाच्या काळात आम्ही लसीकरण मोहिमेची गती कमी होऊ देणार नाही उलट लसीकरण वाढवणं गरजेचं आहे. तसेच महिलांनी मासिक पाळीच्या काळातही लस घेणं गरजेचं आहे, दर महिन्याला ही प्रक्रिया घडत असल्याने त्यासाठी लसीकरण टाळण्याची गरज नाही."

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णालयात दाखल होण्याबाबत निर्णय घ्या

बरेच लोक कोरोना झाल्याने घाबरुन रुग्णालयात अॅडमिट होण्यासाठी बेड मिळवण्याचा प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे लोकांनी घाबरुन न जाता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेण्याचं आवाहनही सरकारनं केलं आहे. त्याचबरोबर ऑक्सिजनचा वापर, रेमडेसिव्हीर आणि टोसिलिझूमॅब ही औषधं जी कोविडच्या रुग्णांसाठी महत्वाची आहेत, त्याचा योग्यप्रकारे वापर व्हावा यावरही सरकारने भर दिला.

फिजिकल डिस्टंसिंग पाळणं महत्वाचं कारण...

केंद्र सरकारनं पुढे म्हटलं की, संशोधनातून हे समोर आलंय की जर फिजिकल डिस्टंसिंगचं पालन केलं नाही तर एक व्यक्ती ३० दिवसांमध्ये ४०६ व्यक्तींना बाधित करु शकतो. त्याचबरोबर जर शाररिक संपर्क ५० टक्क्यांनी कमी झाला तर एक व्यक्ती या कालावधीत १५ लोकांना बाधित करु शकतो. तसेच हे प्रमाण ७५ टक्क्यांनी कमी झालं तर एक व्यक्ती ३० दिवसांत सुमारे ३ लोकांना बाधित करु शकतो.

सध्या भारताकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध पण...

सध्या भारताकडे पुरेसा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पण रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता असताना तो रुग्णालयांपर्यंत कसा पोहोचवायचा हा प्रश्न आहे. पण ऑक्सिनजसाठी लोकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही आम्ही तो रुग्णालयांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यासाठी भारतानं परदेशातूनही ऑक्सिजनचे टँकर विकत आणि भाडेतत्वावर मागवले आहेत, पण आता ऑक्सिजनची वाहतूक हेच मोठं आव्हान आहे, असं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.