ममतांना पुन्हा धक्का; 'नुसतंच बसून घुसमट होतेय' म्हणत खासदाराचा राज्यसभेतच राजीनामा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 12 February 2021

या निवडणुकीत कशाही प्रकारे आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.

नवी दिल्ली : बंगालमध्ये येत्या काही महिन्यांतच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातले सध्याचे राजकीय वातावरण अगदी गरमागरम आहे. या निवडणुकीत कशाही प्रकारे आपली सत्ता स्थापन व्हावी, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसमधून अनेक आमदारांनी यापूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना धक्क्यांवर धक्के यापूर्वी बसले आहेत. त्यातच आता आणखी एका खासदाराने आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे.

तृणमूल काँग्रेसचे खासदार दिनेश त्रिवेदी यांनी राज्यसभेतच आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. असं म्हटलं जातंय की ते देखील येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जाणार आहेत. राज्यसभेतील आपल्या भाषणात आपल्या राजीनाम्याची घोषणा करत त्यांनी म्हटलं की, बंगालमध्ये ज्याप्रकारची हिंसा होत आहे, ते पाहून मला बसल्या बसल्या खूपच विचित्र वाटत आहे.

हेही वाचा - ममतांच्या 'हम्बा हम्बा, रम्बा रम्बा'वर भन्नाट मीम्स; व्हायरल व्हिडीओत का म्हणाल्या असं?

माझ्याकडून हे शांतपणे पाहिलं जात नाहीये. आता आम्ही करायचं तरी काय? आम्ही एकाच मर्यादेत अडकलो आहोत. पक्षाचे काही नियम आहेत. त्यामुळे माझी देखील घुसमट होत आहे. तिकडे अत्याचार होत आहे. तर आज माझ्या आतला आवाज म्हणत आहे की, नुसतंच बसून गप्प राहण्यापेक्षा आपण इथून राजीनामा द्यावा. मी इथे घोषणा करतो आहे की मी राज्यसभेच्या पदाचा राजीनामा देत आहे.  

भाजपात होऊ शकतात सामील
सुत्रांकडून अशी माहिती मिळाली आहे की, दिनेश त्रिवेदी गेल्या एक महिन्यापासून सातत्याने भाजपच्या संपर्कात आहेत. आता अमित शहा यांच्या बंगालच्या दौऱ्यादरम्यान त्यांची भाजपच्या प्रमुख नेत्यांशी चर्चा झाली आहे. त्यानंतर हे ठरलंय की ते टीएमसीचा राजीनामा देऊन भाजप प्रवेश करतील. दिनेश त्रिवेदी यांचा राज्यसभेचा कार्यकाळा अलिकडेच सप्टेंबर 2020 मध्ये सुरु झाला आहे. त्यांनी टीएमसीचा राजीनामा दिल्यानंतर विधानसभा निडवणुकीनंतर त्या जागेवर देखील पोटनिवडणुक होईल. भाजप आणि दिनेश त्रिवेदी हे बंगालमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर पुन्हा राज्यसभेत येतील. तसेच त्यांच्यासमोर विधानसभेची निवडणुक लढवण्याचाही प्रस्ताव आहे. मात्र, अद्याप याबाबत कसलीच स्पष्टता नाहीये. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC Rajya Sabha MP Dinesh Trivedi resigned from Rajya Sabha