Z सुरक्षा, ऑफिसला भगवा रंग; ममतादीदींच्या विश्वासू नेत्याचे भाजपत जाण्याचे संकेत

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 15 December 2020

शुभेंदु अधिकारी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. दि. 27 नोव्हेंबर रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मी पश्चिम बंगाल आणि भारताचा पूत्र आहे. मी नेहमी पश्चिम बंगालच्या लोकांसाठी लढेन, असे वक्तव्य त्यांनी राजीनामा देताना केले होते.

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहेत. त्यापूर्वीच तेथील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. बंडखोरीचे संकेत दिलेले तृणमूल काँग्रेसचे (टीएमसी) नेते आमदार शुभेंदु अधिकारी यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. 'इंडिया टुडे' या इंग्रजी वृत्त वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, 'आयबी'चा गोपनीय अहवाल आणि धमकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने शुभेंदु यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुभेंदु अधिकारी हे आमदारपदाचाही राजीनामा देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

शुभेंदु अधिकारी यांनी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील कांथी येथे त्यांच्या नावाने एक कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाला भगव्या रंगाने रंगवल्याचे सांगण्यात येते. या कार्यालयाला 'शुभेंदु बाबू सहायता केंद्र' असे नाव देण्यात आले आहे. शुभेंदु यांचे निकटवर्तीय कनिष्क पांडा यांना भगव्या कार्यालयाबाबत विचारले असता त्यांनी हा रंग त्याग आणि सेवेचे प्रतीक असल्याचे म्हटले. यामुळे शुभेंदु अधिकारी यांनी भाजपत जाण्याचे निश्चित केले असल्याची चर्चा सुरु आहे. 

हेही वाचा- 'काही घटकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न'

शुभेंदु अधिकारी हे ममता बॅनर्जी सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. दि. 27 नोव्हेंबर रोजी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. मी पश्चिम बंगाल आणि भारताचा पूत्र आहे. मी नेहमी पश्चिम बंगालच्या लोकांसाठी लढेन, असे वक्तव्य त्यांनी राजीनामा देताना केले होते. त्याचबरोबर टीएमसीमध्ये राहून काम करणे शक्य नसल्याचा संदेशही त्यांनी पक्षाला दिला होता. त्यांचा राजीनामा ममता बॅनर्जी यांच्यासाठी मोठा झटका असल्याचे बोलले जाते. दरम्यान, शुभेंदु अधिकारी यांच्यानंतर राजीव बॅनर्जी हे टीएमसीला धक्का देऊ शकतात असे बोलले जात आहे. 

हेही वाचा- RSS चं भाजपवर नियंत्रण राहिलं नाही; शेतकरी नेत्याचं सरसंघचालकांना पत्र

त्याचबरोबर बंगालमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या हल्ल्यानंतर भाजपचे राज्य प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांना बुलेटप्रूफ कार मिळेल. त्यांना पूर्वीच झेड सुरक्षा आहे. विजयवर्गीय हे पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत जात होते, त्यावेळी त्यांच्या कारवर हल्ला झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TMC rebel leader suvendu adhikari gets z security from home ministry