...तर ममता बॅनर्जींचा खून केला जाऊ शकतो; TMC च्या मंत्र्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 13 December 2020

अलिकडेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमधील दौऱ्यामध्ये त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती.

कोलकाता : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावरील हल्ल्यानंतर पश्चिम बंगालमधील ममता सरकारवर चहुबाजूंनी आरोप होत आहेत. यादरम्यानच तृणमूल सरकारचे मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी आरोप केलाय की, जर भाजप राज्यामध्ये सरकार बनवण्यात अयशस्वी ठरली तर ते गुप्तपणे काही लोकांना पाठवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची हत्या करु शकतात. मुखर्जी यांच्या या आरोपानंतर आता भाजपा-तृणमूलमधील सत्तेचे राजकारण आणखीनच गरम झालं आहे. पश्चिम बंगालचे ग्रामीण विकास मंत्री सुब्रत मुखर्जी यांनी राज्यात एका सभेला संबोधित करताना म्हटलं की, जर ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निवडणूक लढवल्यानंतर भाजपला विजय प्राप्त झाला नाही तर ते ममता बॅनर्जी यांची हत्या करु शकतात.

हेही वाचा - मुली संबंध स्वत: ठेवतात, ब्रेकअपनंतर करतात बलात्काराची तक्रार; महिला आयोगाच्या अध्यक्षांचं विधान

अलिकडेच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर पश्चिम बंगालमधील दौऱ्यामध्ये त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली होती. या पार्श्वभूमीवर हे विधान महत्त्वपूर्ण मानले जात आहे. भाजपाकडून असा आरोप लावला गेलाय की, टीएमसी कार्यकर्त्यांनी हार्बर क्षेत्रातील सिरकोलमध्ये भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वाहनांच्या ताफ्यावर दगडफेक करुन हल्ल्याचा प्रयत्न केला. नड्डा याठिकाणी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी आले होते. या हल्ल्यात भाजपाचे महासचिव कैलाश विजयवर्गीय जखमी झाले होते.

सुब्रत मुखर्जी यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी म्हटलं की, राज्य सरकारला जनतेचे समर्थन मिळत नाहीये, त्यामुळे ते सहानुभूती मिळवण्यासाठी म्हणून अशी निराधार वक्तव्ये करत आहेत. घोष यांनी पुढे म्हटलं की, अलिकडेच ममता बॅनर्जी यांनी तुरुंगात जाण्यासंदर्भात एक वक्तव्य केलं आहे. कारण त्यांना माहितीय की निवडणुकीच्या निकालानंतर त्या तुरुंगात जाऊ शकतात. त्यांनी म्हटलं की, ममता यांच्या मंत्र्यांनी म्हटलंय की ममतांच्या हत्येचा कट रचला जातोय मात्र याप्रकारचा अपराध कोण करेल? लोकांची मते मिळवण्यासाठी याप्रकारची वक्तव्ये केली जात आहेत, जेणेकरुन त्यांना सहानुभूती मिळवता यावी.

हेही वाचा - पश्चिम बंगाल हिंदू राज्य तर भारत हिंदू राष्ट्र होणार- साध्वी प्रज्ञासिंह

पश्चिम बंगालमध्ये अलिकडेच भाजपाच्या कार्यकर्त्यांवर हल्ला झाला होता. घरोघरी जाऊन प्रचार करणाऱ्या पक्ष कार्यकर्त्यांवर लोकांच्या एका समुहाने हल्ला केला होता तसेच एका कार्यकर्त्यांचा मारहाणीत मृत्यू झाला होता. तर या घटनेत इतर सहा लोक जखमी झाले होते.
बैरकपूरचे भाजपचे खासदार अर्जून सिंह यांनी आरोप केलाय की तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच भवाल नावाच्या या कार्यकर्त्याची हत्या केलीय. तर टीएमसीने या आरोपांना झिडकारून लावलंय. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tmc subrata mukherjee says that bjp may conspire assassinate mamata banerjee if they lost in election