
व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बोलण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा श्रोत्यांमधील काही जणांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या.
कोलकता - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात जय श्रीराम अशी घोषणाबाजी झाल्यानं तृणमूल काँग्रेसनं हा पश्चिम बंगालचा आणि ममता बॅनर्जींचा अपमान असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता विधानसभेच्या निवडणुकीनिमित्त राजकीय वातावरण तापलेलं असताना तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्याकडून याच मुद्द्यावर एकमेकांवर टीका टीप्पणी केली जात आहे.
भाजपच्या ‘जय श्रीराम’ या घोषणेला टक्कर देण्यासाठी तृणमूल काँग्रेस पक्षाच्या ‘वेस्ट बेंगाल अँड कोलकता युनिव्हर्सिटी प्रोफेसर असोसिएशन’ने (डब्ल्यूईबीसीयूपीए) ‘हे राम’ चा नारा दिला आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांमधील ‘डब्ल्यूईबीसीयूपीए’चे सभासद ‘हे राम’ लिहिलेले फलक घेऊन येथील प्रेस क्लबमध्ये एकत्र आले होते.
हे वाचा - 'जय श्रीराम'शी वैर परवडणार नाही'; अमित शहांची ममतांवर घणाघाती टीका
व्हिक्टोरिया मेमोरिअल येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या बोलण्यासाठी उभ्या राहिल्या होत्या, तेव्हा श्रोत्यांमधील काही जणांनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या होत्या. त्यावर नाराजी व्यक्त करीत ममता बॅनर्जी यांनी भाषण न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या घटनेच्या निषेधार्थ ‘तृणमूल’च्या या संघटनेने ‘हे राम’चा नारा दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष कृष्णकली बासू म्हणाले की, महात्मा गांधी यांच्यावर जेव्हा गोळ्या झाडण्यात आल्या तेव्हा त्यांनी ‘हे राम’ असे शब्द उच्चारले होते. त्यामुळे नथुराम गोडसे यांचे पूजन करणाऱ्यांना रामाच्या नावाने घोषणा देणे शोभत नाही.
हेही वाचा - ओवैसींनी काँग्रेसला म्हटलं 'बँड बाजा पार्टी'; 'भाजपची B टीम' या आरोपावर दिलं प्रत्युत्तर
भाजपने राज्यात रॅली आणि कार्यक्रमांचे आयोजन केले असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करताना म्हटलं की, राज्यातील जनता त्या पक्षाचं कधीच समर्थन करणार नाही जो आपआपसात भांडण लावत आहे. केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी केंद्र सरकारसोबत वैर पत्करलं असून जय श्रीराम या घोषणेचा अपमानही केला आहे. त्या पक्षात कोणीच देशभक्त एक मिनिटासाठीही थांबू शकत नाही असं स्मृती इराणी यांनी म्हटलं.