ममता बॅनर्जींना हादरा; दोन आमदार, 40 नगरसेवक भाजपमध्ये!

ममता बॅनर्जींना हादरा; दोन आमदार, 40 नगरसेवक भाजपमध्ये!

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपाठोपाठ पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना भाजपने आज दुसरा मोठा धक्का दिला. "तृणमूल'चे दोन आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचा एक आमदार आणि विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने "तृणमूल'च्या गडाचा एक मोठा चिरा ढासळला. राजधानी दिल्लीमध्ये या नेत्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कमळ हाती घेतले. 

प.बंगालमधील "उत्तर-24 परगणा' जिल्ह्यातील भटपाडा आणि कंचरपाडा या "तृणमूल'च्या ताब्यातील दोन महापालिकांमधील 40 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षांतरामुळे या दोन्ही महापालिकांमधील तृणमूल कॉंग्रेसची सत्ता धोक्‍यात आली आहे. लवकरच नैहाटी महापालिकेतील नगरसेवक देखील भाजपची वाट धरण्याची शक्‍यता आहे. भाजपचे नेते मुकूल रॉय यांचे पूत्र शुभ्रांगशू रॉय यांनी पित्याच्या पावलावर पाऊल टाकत भाजपमध्ये प्रवेश केला. ते बिजपूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.

विष्णपूर येथील "तृणमूल'चे आमदार तुषारकांती भट्टाचार्य आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे हेमताबाद येथील देवेंद्रकांत रॉय यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान हुगळीमध्ये आयोजित सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूलचे अनेक नेते आमच्या संपर्कात असल्याचे म्हटले होते. लोकसभा निवडणुकीनंतर आता मोदींच्या वक्तव्याचा इफेक्‍ट दिसू लागला आहे. 

हा पहिला टप्पा 

या वेळी बोलताना भाजप नेते आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय म्हणाले, ""पश्‍चिम बंगालमध्ये ज्याप्रमाणे सात टप्प्यांमध्ये निवडणूक झाली त्याचप्रमाणे भाजपमधील इनकमिंगदेखील सात टप्प्यांत होईल. आज फक्त पहिला टप्पा होता.'' तत्पूर्वी मुकूल पूत्र शुभ्रांगशू रॉय यांच्यावर पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत त्यांची याआधीच "तृणमूल'मधून हकालपट्टी करण्यात आली होती. 

सध्या तृणमूल कॉंग्रेसचे वीस नगरसेवक दिल्लीमध्ये आहेत, आमची ममतादीदींवर नाराजी नाही पण पश्‍चिम बंगालमधील ताज्या विजयामुळे आम्हाला भाजपमध्ये प्रवेश करावा लागत आहे. भाजप लोकांसाठी काम करू लागला असल्याने तो लोकप्रिय होतो आहे. 

- रूबी चॅटर्जी, भाजप नेत्या 

मंत्र्यांवर कारवाईची शक्‍यता 

लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभावानंतर तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी या त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मोठे फेरबदल करण्याची शक्‍यता आहे. मंत्र्यांचा त्यांच्या मतदारसंघातील कामगिरीचा आढावा घेतल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये बदल केले जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली.

नाकर्त्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चूही दिला जाऊ शकतो. रविंद्रनाथ घोष यांच्यासह उत्तर बंगालमधील अनेक बड्या नेत्यांवर ममता बॅनर्जी नाराज आहेत. मलय घटक आणि गौतम देव यांच्यासह अन्य नेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com