स्थानिक पक्ष 'मालामाल' ; 'समाजवादी' सर्वात श्रीमंत

वृत्तसंस्था
Tuesday, 22 May 2018

समाजवादी पक्ष, तेलुगू देसम पक्ष आणि अण्णा द्रमुक पक्ष या तीन श्रीमंत पक्षाचे एकूण उत्पन्न 204.56 कोटी असून, हे उत्पन्न 32 स्थानिक पक्षांच्या एकूण 63.72 टक्के इतके असल्याची माहिती मिळत आहे.

नवी दिल्ली : देशातील 32 स्थानिक पक्षांचे 2016-17 मधील उत्पन्न 321.03 कोटींवर गेल्याचे नुकतेच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष सर्वात श्रीमंत पक्ष ठरला आहे. समाजवादी पक्षाचे एकूण उत्पन्न 82.76 कोटी असल्याचे 'असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स्' (एडीआर) या संस्थेने आज (मंगळवार) सादर केलेल्या अहवालातून समोर आले आहे.  

या सर्व 32 स्थानिक पक्षाकडून एकूण खर्च हा 435.48 कोटी इतका दाखविण्यात आला आहे. स्थानिक 32 पक्षांपैकी 17 पक्षांनी 114.45 कोटींचे विनाखर्च उत्पन्न दाखविले आहे. 'या 32 स्थानिक पक्षांपैकी समाजवादी पक्षाचे उत्पन्न सर्वात जास्त असून, त्याची रक्कम 82.76 कोटी इतकी आहे. ही रक्कम 32 पक्षांच्या 25.78 टक्के इतकी आहे. समाजवादी पक्षानंतर आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या 'तेलुगू देसम पक्षा'चे (टीडीपी) नाव पुढे येत आहे. टीडीपीचे एकूण उत्पन्न 72.92 कोटी आहे. त्यानंतर तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या 'अण्णा द्रमुक पक्षा'चे (एआयएडीएमके) नाव येत आहे. अण्णा द्रमुक पक्षाचे एकूण उत्पन्न 48.88 कोटी इतके आहे, अशी माहिती 'एडीआर'ने जारी केलेल्या अहवालात उघड झाली.   

दरम्यान, समाजवादी पक्ष, तेलुगू देसम पक्ष आणि अण्णा द्रमुक पक्ष या तीन श्रीमंत पक्षाचे एकूण उत्पन्न 204.56 कोटी असून, हे उत्पन्न 32 स्थानिक पक्षांच्या एकूण 63.72 टक्के इतके असल्याची माहिती मिळत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Total income of 32 regional parties Rs 321 crore in 2016 17 Samajwadi Party richest says ADR report