भारतातील २० टक्के भूजलात विषारी द्रव्ये; पिण्यासाठी व सिंचनासाठी धोकादायक

पीटीआय
Saturday, 13 February 2021

सरकारी आणि बिगर सरकारी संघटनांच्या विविध अहवालांमध्ये अर्सेनिकमुळे दूषित झालेले क्षेत्र आणि बाधित लोकांची संख्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली  - भारतीयांना हवा, जल आणि अन्य प्रकारच्या प्रदूषणाला कायम सामोरे जावे लागते. आता भूगर्भाखालील पाण्यातही विषारी अंश आढळले आहेत. देशातील २० टक्क्यांपेक्षा जास्त जमिनीखालील पाण्यात अति तीव्र विषारी द्रव्य (अर्सेनिक) असल्याचे निरीक्षण आयआयटी खड्गपूरने केलेल्या अभ्यासात नोंदविले आहे. यासाठी या शैक्षणिक संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्तेवर(एआय) आधारित केल्या जाणाऱ्या भाकिताच्या प्रारूपाचा वापर केला. 

सरकारी आणि बिगर सरकारी संघटनांच्या विविध अहवालांमध्ये अर्सेनिकमुळे दूषित झालेले क्षेत्र आणि बाधित लोकांची संख्या कितीतरी पटीने जास्त असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. यासंबंधीचा लेख ‘टोटल एन्हॉयर्न्मेंटल’ या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. यासाठी भारतातील अर्सेनिकचे प्रमाण शोधण्यासाठी जास्तीत जास्त नमुने घेण्याची गरज या लेखात नोंदविली आहे. याबाबतची माहिती आयआयटी खड्गपूरमधील सहप्राध्यापक आणि या लेखाचे मुख्य लेखक अभिजित मुखर्जी यांनी दिली. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अर्सेनिक हे अजैविक रूपातील अति तीव्र विषारी द्रव्य असून त्याचा पिण्याच्या पाण्यावर आणि अन्नावर दीर्घकालीन परिणाम होत असल्याने अन्य आजारांप्रमाणे कर्करोग आणि त्वचेसंबंधातील गंभीर आजार होण्याचा धोका असतो, असे जागतिक आरोग्य संघटनने (डब्ल्यूएचओ) ने म्हटले आहे. 

आर्सेनिकचे सर्वाधिक प्रमाण (टक्केवारीत) 
नव्या अभ्यासानुसार सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा या नदींचे खोरे आणि भारतीय द्विपसमूहातील काही विभागांमध्ये भूजलात अर्सेनिकची तीव्रता जास्त आहे, असे आढळले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पंजाब - ९२ 
बिहार - ७० 
पश्‍चिम बंगाल - ६९ 
आसाम - ४८ 
हरियाना - ४३ 
उत्तर प्रदेश - २८ 
गुजरात - २४ 

अर्सेनिकचे प्रमाण कमी असलेली राज्ये (आकडेवारी टक्क्यांत) 
मध्य प्रदेश - ९ 
कर्नाटक - ८ 
ओडिशा- ४ 
महाराष्ट्र - १ 
जम्मू-काश्‍मीर (आग्नेय भाग) - १ 

‘एआय’च्या साह्याने संशोधन 
भारतात भूगर्भातील पाण्यात एक लिटरला दहा मायक्रोग्रॅम अर्सेनिकचे प्रमाण ग्राह्य 
धरले जाते. या पेक्षा अधिक प्रमाण शोधण्यासाठी जे प्रारूप शास्त्रज्ञांनी वापरले ते अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानावर आधारित होते. या प्रारूपाचे नाव ‘रँडम फॉरेस्ट’ असे आहे. आधीच्या अभ्यासापेक्षा या तंत्रज्ञानाद्वारे भूजलातील अर्सेनिकच्या पातळीच्या अंदाज जास्त अचूकतेने घेणे शक्य झाल्याचे संशोधक व या लेखाचे सहलेखक सौम्यजित सरकार आणि मधुमिता चक्रवर्ती यांनी सांगितले. 

संशोधनातील निरीक्षणे 
- भारतातील २५ कोटी जनता बाधित होण्याची शक्यता 
- भूजल सिंचनावर अप्रत्यक्ष परिणाम 
- पश्‍चिम बंगाल, आसाम, उत्तर प्रदेश, झारखंड, पंजाब आणि हरियानाला सर्वाधिक फटका 
- भारतात पिण्यासाठी ८० टक्के भूजलाचा वापर होत असल्याने चिंता 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Toxic substances in 20 percent of India groundwater are dangerous for drinking and irrigation