गुजरातमध्ये व्यापार, उद्योगाची चक्रे थांबली

महेश शहा : सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

अहमदाबाद : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरातला बसला असून, यामुळे राज्यातील व्यापार मंदावला असून औद्योगिक उत्पादनामध्येही मोठी घट झाली आहे. बाजारपेठाच ओस पडल्याने वाहतूक उद्योगालाही याचा जबर फटका बसला. शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठांमध्ये उठाव नसल्याने साठलेला कृषी माल वाया जाण्याची भीती वर्तविली जात आहे. नोटाबंदीमुळे अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

अहमदाबाद : केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमग्राउंड असणाऱ्या गुजरातला बसला असून, यामुळे राज्यातील व्यापार मंदावला असून औद्योगिक उत्पादनामध्येही मोठी घट झाली आहे. बाजारपेठाच ओस पडल्याने वाहतूक उद्योगालाही याचा जबर फटका बसला. शेतकऱ्यांच्या मालास बाजारपेठांमध्ये उठाव नसल्याने साठलेला कृषी माल वाया जाण्याची भीती वर्तविली जात आहे. नोटाबंदीमुळे अस्वस्थ झालेल्या शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत.

बाजारपेठांमध्ये पुरेसे भांडवल उपलब्ध नसल्याने औद्योगिक उत्पादनामध्येही मोठी घट झाली आहे. हिरे, दागिने, रसायने, सिरॅमिक्‍स आणि कापड उद्योगाला या नोटाबंदीचा मोठा फटका बसला आहे. या उत्पादनांच्या काही कारखान्यांत उत्पादन मंदावले असून, काहींमधील काम ठप्प झाले आहे. गुजरातमधील कापड बाजारपेठेची व्याप्ती मोठी असून, या उत्पादनासही नोटाबंदीचा फटका बसला आहे. राज्यातील अनेक कापड कारखाने बंद पडले असल्याचे गुजरात कापडनिर्मिती संघटनेचे अध्यक्ष विजय पुरोहित यांनी सांगितले. सुरतमध्ये सिंथेटिक कपड्यांची बाजारपेठ 40 हजार कोटी रुपयांची असून आता बाजारपेठेमध्ये मंदीचे वातावरण असल्याने अनेक कारखान्यांत केवळ एकाच शिफ्टमध्ये काम सुरू आहे. भविष्यामध्ये परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर आम्हाला उत्पादन बंद करावे लागेल, असे काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

हिरे व्यापाऱ्यास फटका
गुजरातमधील हिरे बाजाराची व्याप्ती 90 हजार कोटी रुपये एवढी असून, या उद्योगामध्ये काम करणाऱ्या लघू आणि मध्यम उद्योजकांची नोटाबंदीमुळे आर्थिक कोंडी झाली आहे. या क्षेत्रातील अनेक कंपन्यांनी कामगारांच्या दिवाळी सुट्यांमध्ये चक्क 1 डिसेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिरे बाजारातील बहुतांश व्यवहार हे रोखीमध्ये चालतात; पण चलनी नोटांचा तुटवडा जाणवत असल्याने अंगडियांनाही व्यवहार करणे अशक्‍य झाले आहे.

आर्थिक आणीबाणी
रसायनांच्या उत्पादनात निम्म्याने घट
मोर्बीतील "सिरॅमिक क्‍लस्टर'ला मोठा आर्थिक फटका
वाहतूकदारांना द्यायला कंपन्यांच्या व्यवस्थापनाकडे पैसे नाहीत
अनेक कंपन्यांचे दिवाळे वाजण्याची भीती
विवाह उद्योग 50 टक्‍क्‍यांनी घटल्याचा इव्हेंट कंपन्यांचा दावा

सुरतमध्ये आंदोलनाचा भडका
रिझर्व्ह बॅंकेने राज्यातील सहकारी बॅंकांवर आर्थिक निर्बंध लादल्याने गुजरातमधील शेतकऱ्यांचा असंतोष उफाळून आला आहे. सुरतमध्ये आज विविध भागांत शेकडो शेतकऱ्यांनी रस्त्यांवर उतरत आंदोलन केले. अनेक ठिकाणी रस्त्यांवर दूध ओतून सरकारचा निषेध करण्यात आला. "सुरत खेडूत समाज' या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दीडशे ट्रॅक्‍टर आणि 50 ट्रकमध्ये भरून शेतमाल आणला होता. यामध्ये ऊस, तांदूळ आणि भाज्यांचा समावेश होता अशी माहिती सूत्रांनी दिली. माध्यमांशी बोलताना "सुरत खेडूत समाज' या संघटनेचे नेते दर्शन नाईक म्हणाले की, जवळपास दोन लाख शेतकऱ्यांची जिल्हा आणि सहकारी बॅंकांमध्ये खाती आहेत. केंद्राने सहकारी बॅंकांनाच पैसे बदलून देण्यास मनाई केली असल्याने शेतकऱ्यांनी आता कोठे जायचे? पेरणीसाठी

शेतकऱ्यांना कोण पैसे देणार?
व्यापाऱ्यांकडेच पैसे नसल्याने आता त्यांनी शेतीमालाची खरेदीही थांबविली आहे. सहकारी बॅंकांनी शेतकऱ्यांना नोटा उपलब्ध करून दिल्या असत्या तर त्यांचा बराच त्रास कमी झाला असता. पैसे मिळत नसल्याने शेतकऱ्यांना आपला माल रस्त्याच्या कडेला टाकून द्यावा लागतो आहे, असे त्यांनी नमूद केले.

Web Title: trade cycles in gujarat stop