esakal | VIDEO - लग्नात कोरोना प्रोटोकॉलचं उल्लंघन; जिल्हाधिकारी वऱ्हाडींसह पोलिसांवर भडकले

बोलून बातमी शोधा

VIDEO - कोरोनाचे नियम मोडले; जिल्हाधिकारी वऱ्हाडींसह पोलिसांवर भडकले

लोकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं होत असलेलं उल्लंघन पाहून राग अनावर झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांना अपशब्दात सुनावलं आहे.

VIDEO - कोरोनाचे नियम मोडले; जिल्हाधिकारी वऱ्हाडींसह पोलिसांवर भडकले
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार उडाला आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनसदृश्य कडक निर्बंध लागू केले आहेत. यामध्ये नाइट कर्फ्यूचाही समावेश आहे. नॉर्थ इस्ट राज्यांमध्येही कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्यास सुरवात केली आहे. नियम मोडणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. सध्या त्रिपुरामधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील हा व्हिडिओ असून यामध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी भडकल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे.

त्रिपुरामधील पश्चिम त्रिपुरा जिल्ह्यातील व्हिडिओ असून जिल्हाधिकारी शैलेश कुमार यादव यांनी कोरोनाच्या गाइडलाइन न पाळल्यानं दोन लग्नाचे हॉल सील करण्याचे आदेश दिले. एवढंच नाही तर पोलिसांना आदेश देताना नाइट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याबद्दल नवविवाहित दाम्पत्यासह लग्नात सहभागी झालेल्या सर्व मंडळींविरोधात गुन्हा दाखल कऱण्यास सांगितलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी शैलेश यादव भडकलेले दिसतात. लोकांची गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं होत असलेलं उल्लंघन पाहून राग अनावर झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी अपशब्दातही संबंधितांना सुनावलं आहे.

कोरोनाच्या काळात उल्लंघन करणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि कामात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी झापलं. यावेळी त्यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला. जिल्हाधिकाऱ्यांनी आगरताळा पोलिस स्टेशनचे प्रभारी आणि ऑन ड्युटी पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करा अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात यावी अशी मागणीही जिल्हाधिकारी शैलेश यादव यांनी केली.

हेही वाचा: स्मशानभूमित जळतायेत असंख्य चिता; भारतातील स्थितीची WHO ला चिंता

त्रिपुरात दररोज सरासरी 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. तर दुसरीकडे राज्यात 1 हजारपेक्षा जास्त रुग्णांना दाखल करून घेणारी व्यवस्था नसल्यानं मोठं आव्हान राज्य सरकारसमोर आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आगरताला महापालिकेच्या हद्दीत 22 ते 30 एप्रिलपर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला आहे. रात्री दहा ते सकाळी 5 या वेळेत ही संचारबंदी लागू असणार आहे.