NamasteyTrump : ट्रम्प यांनी साबरमती आश्रमात फिरविला चरखा

वृत्तसंस्था
Monday, 24 February 2020

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी साबरमती आश्रमात जोरदार तयारी करण्यात आली होती. तेथे पत्नी मेलानियासोबत त्यांनी चरखा फिरविला. तसेच त्यांनी साबरमती अभिप्रायही लिहिला. 

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले असून, त्यांनी अहमदाबादमध्ये रोड शो केल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यावेळी त्यांना चरखा फिरविण्याचाही मोह आवरला नाही. ट्रम्प यांच्या या दौऱ्याकडे जगभराचे लक्ष लागले आहे.

ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलानिया, कन्या इव्हांका आणि जावई जेर्ड कुश्‍नेर यांच्यासह अमेरिकी प्रशासनातील अनेक बडे अधिकारी भारतात दाखल झाले आहेत. ट्रम्प यांच्या या भारत दौऱ्यामध्ये संरक्षण आणि रणनितीक सहकार्याबाबत अनेक मोठे करार होणे अपेक्षित असून, अर्थकारणाच्यादृष्टीने कळीचा विषय असणारा आयातशुल्काचा मुद्दा मात्र तसा अधांतरी राहू शकतो. ट्रम्प हे तब्बल 36 तास भारतामध्ये असतील. मोदी आणि ट्रम्प यांच्यात मंगळवारी चर्चा होणार असून, यामध्ये व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण- सुरक्षितता, दहशतवादविरोधी रणनीती, धार्मिक स्वातंत्र्य, अफगाणिस्तानातील अमेरिकेचा तालिबान्यांसोबतचा प्रस्तावित शांती करार आणि आशिया प्रशांतमधील स्थिती आदी मुद्दे केंद्रस्थानी असतील. 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीसाठी साबरमती आश्रमात जोरदार तयारी करण्यात आली होती. तेथे पत्नी मेलानियासोबत त्यांनी चरखा फिरविला. तसेच त्यांनी साबरमती अभिप्रायही लिहिला. 

अहमदाबाद शहरामध्ये मोदी आणि ट्रम्प यांचा रोड शो होणार असल्याने त्यासाठी विशेष बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. येथील स्टेडियममध्येच नमस्ते ट्रम्प या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प हे दोघेही सहभागी होणार आहेत. 

या रोड शोमध्ये हॅलो अहमदाबाद हा खास कार्यक्रम असेल त्या माध्यमातून पाहुण्यांना भारतीय संस्कृती आणि वैविध्याचे विशेष दर्शन घडणार आहे. देशभरातील सर्वच राज्यांच्या कलाकारांना त्यांच्या कला सादर करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. मोटेरा स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्या संयुक्त संबोधनापूर्वी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले असून कैलाश खेर आणि अन्य कलाकार व गायक सादरीकरण करतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: TrumpInIndia US President Donald Trump leaves for Sabarmati Ashram from the airport