esakal | टि्वटरची मोठी चूक, जम्मू-काश्मीरला दाखवले चीनचा भूभाग
sakal

बोलून बातमी शोधा

leh main.jpg

लेह येथील वॉर मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमाचे काही पत्रकारांनी लाइव्ह (थेट प्रक्षेपण) करण्यास सुरुवात केल्यानंतर टि्वटरने ही चूक केली.

टि्वटरची मोठी चूक, जम्मू-काश्मीरला दाखवले चीनचा भूभाग

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली- जम्मू-काश्मीर हा चीनचा भूभाग असल्याचे दाखवल्यावरुन रविवारी टि्वटर नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले. टि्वटरने केलेल्या चुकीचा युजर्संनी समाचार घेतला. लडाखची राजधानी लेह येथील वॉर मेमोरियल येथे आयोजित कार्यक्रमाचे काही पत्रकारांनी लाइव्ह (थेट प्रक्षेपण) करण्यास सुरुवात केल्यानंतर टि्वटरने ही चूक केली. दरम्यान, सोमवारी टि्वटरने ही तांत्रिक चूक असून जियो टॅगची समस्या दूर केल्याचे सांगितले. 

देशासाठी हुतात्मा झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ उभारलेल्या हॉल ऑफ फेम मेमोरियलच्या कार्यक्रमाचे राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञ नितीन गोखले यांनी टि्वटरवर लाइव्ह करण्यास सुरुवात केली होती. व्हिडिओत 'जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन' असा लोकेशन टॅग दाखवण्यात आला होता. नितीन गोखले आणि इतर यूजर्सनी त्वरीत ही चूक टि्वटर आणि टि्वटर इंडियाच्या अधिकृत हँडल्सला दाखवून दिली. 

गोखले यांनी थेट प्रक्षेपणानंतर त्वरीत टि्वट केले की, टि्वटरवरील मित्रांनो, मी हॉल ऑफ फेम येथून लाइव्ह केले. हॉल ऑफ फेमचे लोकेशन 'जम्मू-काश्मीर, पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन' सांगितले जात आहे. तुम्ही वेडे झाला आहात काय ? यावेळी त्यांनी इतर टि्वटर यूजर्सलाही हॉल ऑफ फेम लेह लोकेशन टॅग करुन टि्वटरवर लाइव्ह करण्यास सांगितले. 

हेही वाचा- हा तर दलित महिलांचा अपमान, शिवराजसिंह चौहान यांचा कमलनाथ यांच्यावर हल्लाबोल

दरम्यान, टि्वटरने ही तांत्रिक चूक असल्याचे सांगितले. रविवारी आम्हाला तांत्रिक चुकीला सामोरे जावे लागले. हा अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे, हे आम्ही समजू शकतो. आमच्या टीम्सनी यावर काम केले आणि जियो टॅगशी संबंधित चूक शोधून ती चूक दुरुस्तही केली आहे, असे टि्वटरच्या प्रवक्त्याने सांगितले.