
CM शिंदेंच्या २० तासांच्या दिल्ली दौऱ्यात काय घडलं? जाणून घ्या
नवी दिल्ली - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काल (ता. ८) रात्री पावणेआठपासून सुरू झालेल्या दिल्लीच्या ‘सदिच्छा‘ दौऱयाची सांगता, आज दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या दीर्घ चर्चेने झाली. पंतप्रधानांबरोबर दोन्ही नेत्यांनी सुमारे तब्बल दीड तास चर्चा केली. या दौऱयाचा अजेंडा राजकीय नव्हता असे दोघांनीही वारंवार सांगितले तरी, राजकीय व त्यातही येत्या सोमवारी (ता. ११) सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीबाबत महाधिवक्ते तुषार मेहता यांच्यासह राजधानीतील कायदेतज्ज्ञयांबरोबर दोघांनीही चर्चेच्या ज्या अनेक फेऱया केल्या त्या पाहता सोमवारी शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावरील प्रस्तावित सुनावणी भाजप नेतृत्वाच्याच्याही पातळीवर अत्यंत गंभीरपणे घेण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान दोन्ही नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा मुख्यमंत्री शिंदे यांनी मोदी यांना, विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती भेट दिल्या. त्तपूर्वी आज सकाळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या गाठीभएटींना सुरवात करण्याआधी मुख्यमंत्र्यांनी नवीन महाराष्ट्र सदनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर तसेच थोर समाजसुधारक महात्मा फुले यांच्या भव्य पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण केली. मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस यांच्या दौऱयाच्या वेळेसच विधानसभाध्यक्ष राहूल नार्वेकर हेही दिल्ली मुक्कामी आहेत. त्यांना मंगळवारपर्यंत म्हणजे न्यायलयीन सुनावणीवेळीही दिल्लीतच राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांना कायद्याची सखोल माहिती आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबतच्या ज्या ज्या चर्चा कायदेतज्ज्ञांबरोबर झाल्या त्यावेळी नार्वेकर आवर्जून उपस्थित रहातील याची काळजी फडणवीस यांनी घेतल्याचे जाणवले.
दरम्यान शहा यांच्याबरोबरच्या चर्चेवेळीही महाधिवक्ते तुषार मेहता याना तेथे बोलावून घेण्यात आले होते. दोन्ही नेते शनिवारी दुपारीही मेहता यांची भेट घेऊन चर्चा करून आले. त्यानंतर फडणवीस यांनी नार्वेकर यांच्याशीही चर्चा केली. सोमवारी शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण सुनावणीसाठी आहे ते पीठ आहे न्या. सूर्यकांत व न्या. जे बी पारडीवाला यांचे. या पीठासमोरच विधानसभेच्या विशेष अधिवेशनाला परवानगी देण्याच्या याचिकेवरही दीर्घसुनावणी झाली होती. हे तेच दोन्ही न्यायमूर्ती आहेत जे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिध्द आहेत. नुपूर शर्मा प्रकरणात जी सडेतोड मते व्यक्त झाली तेही याच दोघांचे न्यायालय होते. ही सारी पार्श्वभूमी पहाता शिंदे गटाच्या आमदारंच्या अपात्रतेच्या प्रकरणावरील सुनावणीतकोणतीही कसर बाकी राहू नये, यादृष्टीने भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाने त्यात स्वतः लक्ष घातले आहे. शहा हेही यावर सातत्याने ‘लक्ष ठेवून आहेत. मेहता यांच्याबरोबर शिंदे व फडणवीस यांनी दिल्लीत सातत्याने चर्चा केली त्यावरून भाजप यात कोणताही कायदेशीर ‘रिस्क' घेण्याच्या बिलकूल मानसिकतेत नसल्याचेच स्पष्ट होते. या प्रकरणाचा निकाल लागल्यावरच राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याची सूचना भाजप नेतृत्वाने केली आहे.
काल रात्री विमानतळावरून मुख्यमंत्री शिंदे व फडणवीस महाराष्ट्र सदनात आले. त्यानंतर चहा व एक प्लेट भजी असा नाश्ता करून अवघ्या काही मिनिटांत फडणवीस गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे रवाना झाले. बाहेर जाताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे जाणीवपूर्वक टाळले. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेही शहा यांच्याकडे गेले. रात्री नऊला गेलेले दोन्ही नेते मध्यरात्री दीडच्या सुमारास सदनात परतल्याची माहिती आहे. शिंदे यांनी त्या वेळी जेवण केले. शहा यांच्याबरोबरची चर्चा एवढा वेळ झाल्याचे नाकारताना फडणवीस यांनी, आम्ही रात्रभर भेटलो असेही लोक सांगतील असे उपरोधिकपणे सांगितले. फडणवीस रात्री मुक्कामासाठीही महाराष्ट्र सदनात थांबले नव्हते तर ते एका केंंद्रीय राज्यमंत्र्यांकडे मुक्कामी होते अशीही माहिती आहे.
Web Title: Two Issues Discussed Cm Eknath Shinde 20 Hour Visit To Delhi Narendra Modi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..