हैदराबाद पोलिसांची भूमिका संशयास्पद : उज्वल निकम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

तपासासाठी पोलिस जेव्हा चार आरोपींना घेऊन जातात, तेव्हा हे तर उघड आहे की त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. पळून जाताना आरोपींनी दगडफेक केली असा हैदराबाद पोलिसांचा दावा आहे, दगडफेकीने पोलिसांचा जीव खरच धोक्यात येत होता का?​

बारामती : हैदराबाद एन्काऊंटर प्रकरणी पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याची प्रतिक्रीया ज्येष्ठ विधीज्ञ अँड. उज्वल निकम यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, स्वसंरक्षणासाठी केलेला एन्काऊंटर असे सांगितले जात असले तरी सकृतदर्शनी स्वसंरक्षणासाठी असे वाटत नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तपासासाठी पोलिस जेव्हा चार आरोपींना घेऊन जातात, तेव्हा हे तर उघड आहे की त्यांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. पळून जाताना आरोपींनी दगडफेक केली असा हैदराबाद पोलिसांचा दावा आहे, दगडफेकीने पोलिसांचा जीव खरच धोक्यात येत होता का? इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपींना तपासासाठी घेऊन जाताना चार पाच पोलिस नव्हते, अशा तपासासाठी नेताना त्यांच्या हातात बेड्या असायला हव्या होत्या, त्यातही एक बेडी आरोपीच्या हातात आणि एक पोलिसाच्या हातात अशी पध्दत असते, जेणेकरुन आरोपी पळून जाऊ नये.

हैदराबाद एन्काऊंटर करणारा हाच तो अधिकारी 

असे असताना सकृतदर्शनी पोलिसांनी केलेला खून दिसतो. लोकांच्या पहिल्या प्रतिक्रिया त्यांना शिक्षा मिळाल्याने खूष असल्याची आहे, पण अशा प्रकारची शिक्षा जर पोलिस द्यायला लागले तर लोकांचा कायद्यावरचा विश्वास उडेल आणि देशात अराजकता माजेल. चंबळच्या खो-यातील दरोडेखोरही न्याय द्यायचे तेही प्रसिध्द होते, मात्र सामान्य माणसांनी त्यांना कधीही आपलेसे मानले नाही. कारण हे दरोडेखोर सामान्यांना मारतील, लुबाडतील ही भीती होतीच. पोलिसांचे काम आरोपींना अटक करण्याचे आहे, न्यायालय त्यांना न्याय देण्याचे काम करेल, पोलिसांना देखील कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. या आरोपींना ज्या पध्दतीने ठार करण्यात आले ती पध्दत अजिबात योग्य नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ujjwal Nikam doubts the Hyderabad encounter