राजकीय इच्छाशक्तीसाठी युद्धनितीचा वापर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ukraine Russia war

राजकीय इच्छाशक्तीसाठी युद्धनितीचा वापर

युक्रेन युद्धातून भारताने काय धडा घ्यावा याचा एका लेखातून ऊहापोह केल्याबद्दल जनरल मनोज नरवणे (निवृत्त) यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. या लेखात त्यांनी शहाणपणाचे, थेट आणि वास्तव विचार मांडले आहेत. ते म्हणतात, इतिहासात डोकावून बघितले असता युद्धभूमी सतत बदलत आणि उत्क्रांत होत असल्याचे दिसून येते. पहिल्या महायुद्धाचा विचार केला तर खंदकांना भेदण्यासाठी रणगाड्यांचा आविष्कार झाल्याचे दिसून येते.

त्याआधी घोडदळाला नामोहरम करण्यासाठी मशिनगनचा शोध लागला. त्यामुळे सैन्याला खंदकांचा सहारा घ्यावा लागला. विसाव्या शतकात रणगाडेविरुद्ध रणगाडाभेदी यंत्रणा असा सामना चालला. युक्रेनमध्ये हा सामना वेगळ्याच स्तरावर गेला आहे. नव्वदच्या दशकात ड्रोनचा शोध लागला. लष्कराच्या शास्त्रज्ञांनी लवकरच त्याचे शस्त्रात रूपांतर केले.

ड्रोनच्या विध्वंसक क्षमतेचा वापर प्रभावीपणे कसा केला जाऊ शकतो याचा वस्तुपाठ युक्रेनने घालून दिला आहे. या युद्धाने भलीमोठी सशस्त्र रचना (आर्मर्ड फॉर्मेशन), मोठाली शस्त्रसज्ज जहाजे तसेच लढाऊ व मारक क्षमता असलेल्या विमानांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह लावले आहे.

वरील मुद्दे मांडताना नरवणे असाही दावा करतात की, तंत्रज्ञानातील बदल पहिले येतात आणि नंतर काळाच्या ओघात ते लष्करी नेतृत्वात झिरपतात. पण असे नेहमीच घडले आहे काय ? याचे उत्तर नेहमीच असे घडते असे नाही. पहिल्या महायुद्धात विशेषतः ब्रिटिश अधिकाऱ्यांनी घोडदळाला मशिनगनच्या तोंडी दिल्याचे अनेक दाखले आहेत. अर्थात यात कामी आलेले बहुतांश सैनिक ब्रिटिशांच्या ताब्यात असलेल्या भारतासारख्या देशातील होते. क्रिमियन युद्ध, बोअर युद्ध आणि दोन महायुद्धांमध्ये याचे दाखले पदोपदी दाखवून देता येतात.

लष्करी नेतृत्वाच्या अशाच वैचारिक कमजोरीवर नॉर्मन डिक्सन यांनी त्यांच्या पुस्तकात सविस्तर भाष्य केले आहे. हे पुस्तकातून भारतासह अन्य देशांच्या लष्कर अकादमीमध्ये अधिकाऱ्यांना शिकवले जाते.

युक्रेनने रशियाच्या मागच्या पिढीतील रणगाडे कसे कुचकामी आहेत, हे दाखवून दिले. या युद्धात युक्रेनने रशियाचे पंधराशे रणगाडे आणि किमान तीन हजार चिलखती वाहने उध्वस्त केल्याच्या चित्रफिती वा छायाचित्रे उपलब्ध आहेत. या युद्धात रणगाड्यांचा समोरासमोर सामना कुठे झालाच नाही. रशियन रणगाड्यांच्या दृष्यतेच्या टप्प्यात युक्रेनचे रणगाडे आलेच नाहीत. ड्रोन आणि उपग्रह संदेशवहन प्रणालीचा वापर करून युक्रेनने रशियाचे रणगाडे नेमकेपणाने उध्वस्त केले.

रणनितीत बदल नाही

रशियाच्या ज्या शस्त्रांचा जगभरातील सैन्यदलाला सात दशके भीती वाटत होती ही शस्त्रे कालबाह्य झाली असल्याचे युक्रेनने दाखवून दिले. खरे तर अझरबैजानने तुर्कीच्या ड्रोनचा वापर करून आर्मेनियाला जेरीस आणून याची झलक जगाला दाखवू दिली होती. आणि हे युक्रेनपासून काही फार दूरवर घडलेले नव्हते. अझरबैजान आणि आर्मेनिया हे दोन्ही देश सोव्हिएत संघाचा भाग होते. आर्मेनियाला रशियाने सर्व प्रकारची मदत केली.

परंतु, अझरबैजानने जमिनीवरील लढाई आकाशात नेण्याची हुशारी दाखवून आर्मेनियाला नमवले. खरे तर यावर विचार करायला रशियाच्या अधिकाऱ्यांकडे वर्षभराचा वेळ होता. मात्र, त्यांनी यातून धडा घेत रणनीती बदलल्याचे आढळून येत नाही. शंभर वर्षांपूर्वी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जशी चुकीची भूमिका घेतली होती तशीच यांनीही घेतली. यातून एक दिसून येते की सैन्य चुकांमधून धडा घेते पण तोपर्यंत फार वेळ झाला असतो वा बरेच काही नेस्तनाबूत झाले असते. ‘सबकुछ लुटाके होश मे आये तो क्या हुवा’ या ओळी रशियाच्या मुख्यालयाचे गाणे होऊ शकतात.

रशियाला भीती कशाची

आता पुढचा मुद्दा बघू या. चाळीस वर्षांपूर्वी झालेल्या फाल्कन युद्धाने मोठ्या खर्चिक युद्धनौका कमी खर्चाच्या क्षेपणास्त्र प्रणालीपुढे नतमस्तक होऊ शकतात, हे दाखवून दिले होते. काळ्या समुद्रात मोस्कव्हा या रशियन युद्धनौकेला जलसमाधी मिळाली तेव्हा क्षेपणास्त्र प्रणाली अधिक तिखट आणि मारक झाल्याचे जगाला दिसले. रशियाच्या सुरक्षित अशा सेवास्तोपोल या नौदल तळावर मरिन ड्रोनने झालेला हल्ला हाही डोळे उघडणारा ठरावा.

मोठा जल आणि भूभाग अशा क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित ठेवण्याची यंत्रणा नसेल तर लष्करी तळांवर होणारे नुकसान टाळले जाऊ शकणार नाही, हेही यात दिसले. काहीसे असेच विमानांबाबतही घडले. बलाढ्य हवाईदल असे बिरुद मिरविणाऱ्या रशियाच्या वैमानिकांना जरा विचारा की ते युक्रेनच्या हवाई हद्दीत जाण्यास का भीत आहेत. या विमानांच्या इलेक्ट्रॉनिक्स यंत्रणेत क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित ठेवू शकेल एवढे सामर्थ्य नाही.

तसेच क्षेपणास्त्रांपासून सुरक्षित अंतर राखून नेमक्या ठिकाणी हल्ला करता येईल, अशी शस्त्रे या विमानांमध्ये नाहीत. त्यामुळे जमिनीवरच्या लढ्याचा जो धडा रशियाला मिळाला त्याचीच पुनरावृत्ती जल आणि आकाशातील लढाईत झाली. या साऱ्यात रशियाच्या सैनिकाने काळानुरूप बदल आपलासा केला नाही हेच दिसून आले.

आपल्या लेखाच्या शेवटी नरवणे महत्त्वाचा मुद्दा मांडतात. रणनीती, तत्त्वप्रणाली आणि शस्त्रे कोणतीही असली तरीही युद्धाचा उद्देश भूभागावर ताबा मिळविणे हाच असतो, असे ते म्हणतात. आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ते तैवानचे उदाहरण देतात. केवळ ताबा नसल्यामुळेच नॅन्सी पेलोसी यांना तैवानमध्ये येण्यापासून चीन रोखू शकला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. माझ्या मते लष्कर हे राजकीय इच्छाशक्तीचा ठामपणा दाखविण्याचे साधन आहे. ते नेहमीच भूभागावरील ताब्याशी संबंधित नसते.

अनुवादः किशोर जामकर

लष्कर हे राजकीय इच्छाशक्तीचा ठामपणा दाखविण्याचे साधन आहे. युद्धाचे अंतिम ध्येय एखाद्या भूप्रदेशाचा ताबा मिळविणे हेच असते, असा तर्क जनरल मनोज नरवणे (निवृत्त) देतात.

- शेखर गुप्ता