'ट्रेनमध्ये चढलो तर लाठीचार्ज करून बाहेर फेकतात', युक्रेनमधील विद्यार्थ्यांची आपबीती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Soldiers Beaten Indian Student Stranded Ukraine

'ट्रेनमध्ये चढलो तर लाठीचार्ज करून बाहेर फेकतात', युक्रेनमधील विद्यार्थ्यांची आपबीती

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय मुलांना (India Student Stranded Ukraine Russia War ) सुखरूप परत आणण्यासाठी केंद्र सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहीम सुरू केली आहे. त्यांना युक्रेनच्या शेजारील देश हंगेरी आणि रोमानियामार्गे बाहेर काढले जात आहे. युक्रेनच्या विविध भागात अडकलेल्या भारतीयांना परत येण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यांच्यावर लाठीचार्ज केला जात आहे. विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेअर करत त्यांची आपबीती सांगितली आहे.

सध्या युक्रेनमधील कीव्हमधील दोन वैद्यकीय महाविद्यालयातील सुमारे ३५० विद्यार्थी रेल्वे स्थानकावर आहेत. तारास शेवचेन्को नॅशनल युनिव्हर्सिटी आणि बोगोमोलेट्स नॅशनल एम युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना भारतीय दूतावासाने पश्चिम युक्रेनमधील उझरोड किंवा ल्विव्ह येथे जाण्यास सांगितले होते. त्यानुसार विद्यार्थी ल्विव्ह आणि उझरोहोडला जाण्यासाठी ट्रेन पकडण्यासाठी वाट पाहत आहेत. मात्र, त्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नाही. जे लोक ट्रेनमध्ये चढतात त्यांच्यावर लाठीचार्ज करून त्यांना बाहेर फेकले जात आहे, असं विद्यार्थ्यांनी सांगितलंय.

"दूतावासाने आम्हाला सांगितले की आज आम्हाला युक्रेनमधून बाहेर काढले जात आहे. त्यामुळे आम्ही सर्व कीव्ह रेल्वे स्थानकावर आलो. आम्हाला ट्रेनमधून बाहेर फेकले जात आहे. आत जाऊ दिले जात नाही. विद्यार्थ्यांवर लाठ्या-काठ्या आणि इतर गोष्टींनी हल्ले होत आहेत. इथे शेकडो विद्यार्थी आहेत. आम्ही सगळे इथे अडकलो आहोत. कृपया लवकर काहीतरी करा,'' अशी याचना तृतीय वर्षाची विद्यार्थिनी राधिका लक्ष्मीने केली आहे.

युक्रेनमध्ये चिंताजनक स्थिती आहे. तरीही भारत सरकार युद्धग्रस्त देशातून प्रत्येक भारतीय नागरिकाला बाहेर काढेल. विद्यार्थ्यांनी घाबरू नये आणि आमच्याशी संपर्क साधा, असं आवाहन भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी केले होते. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, पुढील 24 तासांत आणखी तीन उड्डाणे नियोजित आहेत. त्यापैकी दोन बुखारेस्टहून भारतात येतील आणि एक बुडापेस्टहून भारतीयांना घेऊन येईल. ऑपरेशन गंगा अभियानांतर्गत आतापर्यंत 1396 भारतीयांना सहा उड्डाणांमध्ये मायदेशी परत आणण्यात आले आहे.

टॅग्स :Russia Ukraine Crisis