Uma Bharti on Navneet Rana | "उद्धव ठाकरेंकडून..."; नवनीत राणांना टॅग करत उमा भारतींचा निशाणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Navneet Rana Ravi Rana
"उद्धव ठाकरेंकडून..."; नवनीत राणांना टॅग करत उमा भारतींचा निशाणा

"उद्धव ठाकरेंकडून..."; नवनीत राणांना टॅग करत उमा भारतींचा निशाणा

खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्री या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा हट्ट धरला आणि नाट्यमय घडामोडींना सुरूवात झाली. आक्रमक शिवसैनिक, राणांच्या घराभोवतीचा वेढा, पोलिसांची नोटीस आणि त्यानंतर त्यांची अटक. या सगळ्या प्रकरणानंतर अखेर त्यांची सुटका झालीच. या सगळ्या प्रकरणाचे पडसाद केवळ राज्यातच नाही, राज्याबाहेरही पाहायला मिळाले.

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनीही या विषयी भाष्य केलं आहे. तसंच ठाकरे सरकारबद्दलची नाराजी व्यक्त केली आहे. तसंच राणा दाम्पत्याच्या हिमतीचा आपल्याला अभिमान वाटतो, अशी प्रतिक्रियाही दिली आहे. आपल्या ट्विटमध्ये उमा भारती म्हणतात, "नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या सुटकेनंतर मला फक्त दिलासाच वाटला नाही, तर त्यांच्या हिमतीचा अभिमानही वाटतो. मी उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून अशी अपेक्षा केली नव्हती. शिवसेना आदरणीय बाळासाहेब ठाकरेंच्या तपश्चर्येतून उदयाला आली आहे. हेच आदरणीय बाळासाहेबांचे संस्कार आणि परंपरा आहे का यावर सगळ्या शिवसैनिकांनी विचार करायला हवा".

उमा भारती पुढे म्हणतात, "हनुमान चालिसेचं पठण करण्यासाठी ठिकाण निवडण्यात नवनीत आणि रवी राणा चुकले असतील, पण हनुमान चालिसेचं कधीही कुठेही पठण करणं चुकीचं नाही. नवनीत राणा 'शेरनी' आहेत. मी कधीतरी मुंबईत येऊन त्यांची भेट घेईन."