'शिक्षणाशिवाय मी जगू शकत नाही'; लॅपटॉप न मिळाल्याने विद्यार्थीनीची आत्महत्या

सकाळ न्यूज नेटवर्क
Monday, 9 November 2020

लॅपटॉप न मिळाल्याने एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची दु:खद घटना तेलंगणामध्ये घडली आहे

हैदराबाद- लॅपटॉप न मिळाल्याने एका विद्यार्थीनीने आत्महत्या केल्याची दु:खद घटना तेलंगणामध्ये घडली आहे. लॉकडाऊनच्या काळात कॉलेजचे क्लासेस अटेंड करण्यासाठी 19 वर्षीय मुलीला लॅपटॉप हवा होता, सेंकड हँड लँपटॉप मिळाल्यासही तिला चालला असता. पण, तिच्या घरच्यांची तिला सेंकड हँड लँपटॉप घेऊन देण्याचीही ऐपत नव्हती. यामुळे नैराश्यात गेलेल्या विद्यार्थीनीने आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे देशातील हजारो विद्यार्थी आणि कुटुंबांना अजूनही लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असल्याचे अधोरेखीत झाले आहे.

विद्यार्थीनीची वडील मोटार सायकल मेकॅनिक आहेत. वडील सांगतात त्यांनी कसेतरी मुलीच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले होते. तिने 12 वी मध्ये 98.5 टक्के मिळवले होते आणि कुटुंबासाठी ती गर्वाची गोष्ट होती. अशा हुशार मुलीला वडिलांनी कर्ज काढून शिकवण्यासाठी दिल्लीला पाठवले होते. तिला सरकारकडून शिष्यवृत्तीही मंजूर झाली होती. पण, लॉकडाऊनमध्ये कॉलेज बंद झाल्याने ती गावाकडे परत आली. वडिलांचाही लॉकडाऊनमुळे उत्पन्नाचा स्त्रोत बंद झाला होता. 

Gold prices:सोने-चांदीच्या दरात वाढ; दिवाळीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी गर्दी

दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या मुलीने ऑक्टोबर महिन्यात आपल्या वडिलांना लॅपटॉप मागितला होता. मोबाईलवर ऑनलाईन क्लासेस अटेंड करणे आणि प्रॅक्टिल वर्क पूर्ण अवघड जात असल्याने तिने लॅपटॉपची मागणी केली होती. वडिलांनी मुलीला काही दिवस थांबण्यास सांगितले. मुलीने नंतर कधीही वडिलांना याबाबत विचारले नाही. रविवारी मुलीने आत्महत्या केली. 

माझ्यासाठी माझ्या कुटुंबीयांना खूप खर्च करावा लागत आहे. मी त्यांच्यासाठी ओझे आहे, माझे शिक्षणही त्यांच्यासाठी ओझे आहे. मला जर शिकता आलं नाही, तर मी जगू शकत नाही, असं मुलीने एका कागदावर लिहिल्याचं आढळलं आहे. माझ्या मुलीसोबत जे झालं ते इतर कोणासोबतही होऊ नये, अशी प्रतिक्रिया मुलीच्या आईने दिली आहे. ती गेल्या काही दिवसांपासून नैराशात होती. तिला परत दिल्लीला जायचे होते. तिच्या मैत्रीनी दिल्लीला जात होत्या. पण, आम्हाला तिला तिकडे पाठवता येत नव्हते, कोठूनही पैशांचीही व्यवस्था होत नव्हती, असं आईने सांगितले आहे. 

मुलीला 1.2 लाख रुपयांची INSPIRE स्कॉलरशीप मार्चमध्ये मिळणार होती. पण, ती अद्याप मिळालेली नाही. शिवाय दुसऱ्या वर्षाला अॅडमिशन घेतल्यानंतर मुलीला हॉस्टेल सोडण्यास सांगण्यात आले होते. कॉलेजने नियमात बदल करुन केवळ पहिल्या वर्षांच्या विद्यार्थ्यांनाच हॉस्टेल मिळेल, असं जाहीर केले होते. त्यामुळे विद्यार्थी प्रचंड तणावात होती, असं कुटुंबीयांनी सांगितलं आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unable To Afford Laptop LSR Student Dies By Suicide At Telangana Home