
येत्या पंधरा वर्षांत अखंड भारत; डॉ. मोहन भागवत
हरिद्वार : सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र असून येत्या पंधरा वर्षांमध्ये पुन्हा एकदा अखंड भारत साकार होईल. हे सगळे काही आमच्या डोळ्यासमोर घडेल. अनेक संत आणि ज्योतिषी यांनी येत्या २० ते २५ वर्षांमध्ये हे स्वप्न साकार होईल असे भाकीत वर्तविले असले तरीसुद्धा आपण सगळ्यांनी या कामाला गती दिली तर येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्येच अखंड भारत साकार होईल, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केला आहे. भागवत यांच्या या वक्तव्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले असून विरोधकांनी संघावर टीका करायला सुरूवात केली आहे.
येथे आयोजित कार्यक्रमामध्ये बुधवारी बोलताना भागवत म्हणाले की, ‘‘ भारत वेगाने प्रगतीच्या मार्गावर धावतो आहे, आम्ही अहिंसेची भाषा बोलू पण हातामध्ये मात्र कायम दंडुकाच राहील. आमच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष अथवा शत्रुत्वाची भावना नाही पण जग हे शक्तीलाच मानत असेल तर आम्ही काय करू शकतो? सनातन धर्म आणि भारत हे दोन समानार्थी शब्द असून जेव्हा राज्य बदलते तेव्हा राजाही बदलत असतो. धर्माच्या उत्थानाबरोबरच भारताचेही पुनरुत्थान होईल. या देशामध्ये अनेकदा सनातन धर्माला नष्ट करण्याचे प्रयत्न झाले पण ज्यांनी हे प्रयत्न केले तेच संपले. भारतामध्ये आल्यानंतर प्रत्येक व्यक्तीमधील दुष्ट प्रवृत्ती संपुष्टात येते. ज्या तथाकथित मंडळींनी सनातन हिंदू धर्माला विरोध केला त्यांच्यामुळेच हिंदू जागृत झाला आहे. अन्यथा हिंदू धर्म झोपलेल्याच अवस्थेत राहिला असता. केवळ धर्माच्या माध्यमातूनच भारताचे उत्थान होऊ शकते. धर्माचे प्रयोजन हेच भारताचे प्रयोजन आहे.’’
भागवत म्हणाले ...
सनातन धर्माला संपवू पाहणारे स्वतःच संपले
राष्ट्रसाधनेत संकटे येतात ती दूर करावी लागतील
विश्व कल्याणासाठी महादेवाने विष प्राशन केले
लंकेमध्ये जाताना हनुमंतासमोर आव्हाने आली
देशाच्या उत्थानाच्या प्रवाहात सर्वांनी सहभागी व्हावे
अहो, राऊतसाहेब सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्व सोडलेच आहे हे वारंवार सिद्ध का करताय? २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मोदींसारखे कणखर नेतृत्व लाभले तर देश कराचीतही भगवा फडकवेल असे विधान तुम्हीच जाहीर व्यासपीठावरून केले होते.
- केशव उपाध्ये, प्रवक्ते भाजप
मोहन भागवत यांच्या म्हणण्यावर मी काही म्हणणे योग्य नाही पण ताकद इतकी वाढवावी लागते की ती परत वापरावीच लागत नाही असे त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे. हिंदुत्व हा शब्द तुम्ही पूजा पद्धतीशी जोडू नका, संघाला पूजा पद्धतीशी असलेला संबंध अभिप्रेत नाही.
- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
मागील आठ वर्षांमध्ये अखंड भारत का होऊ शकला नाही? भागवत हे येत्या पंधरा वर्षांची भाषा का करत आहेत? सरसंघचालक कोणत्या आधारावर अशा प्रकारची विधाने करत आहेत.
- असदुद्दीन ओवेसी, प्रमुख एमआयएम
मोहन भागवतांनी पंधरा वर्षांचा वादा करू नये. पंधरा दिवसांमध्ये अखंड भारत साकार करावा. त्यासाठी आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला हवे, पाकिस्तानला आणि श्रीलंकेलाही भारताशी जोडावे लागेल. काश्मिरी पंडितांची घरवापसी होणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न सन्मान द्यावा.
- संजय राऊत, शिवसेना खासदार
रा.स्व. संघ लोकांच्या भावनाशी खेळतो आहे. अखंड भारत म्हणजे नेमके काय ते आधी त्यांनी स्पष्ट करावे. बांगलादेश, म्यानमार, श्रीलंका आणि अफगाणिस्तान या देशांचे काय होणार हेही त्यांनी सांगावे. या अशा गोष्टींवर लोकांचा पाठिंबा मिळेल असे त्यांना वाटत असेल तर ती मोठी चूक आहे.
- सीताराम येचुरी, सरचिटणीस, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष
Web Title: Unified India Next Fifteen Years Rss Dr Mohan Bhagwat Haridwar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..