प्रतिक्षा संपली! आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली खूशखबर

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 8 January 2021

केंद्रीय आरोग्य मंत्री (Union Health Minister) डॉ. हर्षवर्धन (Dr Harshvardhan)  यांनी देशवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे.

चेन्नई- केंद्रीय आरोग्य मंत्री (Union Health Minister) डॉ. हर्षवर्धन (Dr Harshvardhan)  यांनी देशवासीयांना आनंदाची बातमी दिली आहे. काही दिवसांमध्येच नागरिकांना कोरोनाची लस (Coronavirus Vaccine)  मिळू लागेल, असं त्यांनी म्हटलं आहे. लस राष्ट्रीय स्तरापासून स्थानिक पातळीपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार योजना बनवत असल्याचं हर्षवर्धन यांनी चेन्नईमध्ये म्हटलं. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस दिली जाणार आहे. 

आरोग्यमंत्री लसीकरणाच्या ड्राय रनची समिक्षा करण्यासाठी एक दिवसीय दौऱ्यावर आहेत. डॉ. हर्षवर्धन ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, भारताने अगदी कमी कालावधीमध्ये लस विकसित करुन दाखवली आहे. येत्या काही दिवसात आपण आपल्या देशवासीयांना लस देण्यास सक्षम असू. सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. 

लाखो आरोग्य कर्मचाऱ्यांना ड्रान रनच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे. त्यांना आणखी प्रशिक्षण देण्याची तयारीही सुरु आहे, असं हर्षवर्धन म्हणाले. देशाच्या वेगवेगळ्या भागात ड्राय रनची तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन वेगवेगळ्या केंद्रातील ड्राय रनची समीक्षा करत आहेत. ते सध्या चेन्नईमध्ये असून त्यांनी ओमानंदूर हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल आणि चेंगलपट्टूचा दौरा केला. 

शुक्रवारी देशातील 23 राज्यांमधील आणि केंद्र शासित राज्यांमधील 736 जिल्ह्यांमध्ये ड्राय रन आयोजित केले जात आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा आणि अरुणाचल प्रदेश या अभियानात भाग घेणार नाहीत, कारण हे राज्य या प्रक्रियेतून गेले आहेत. देशात कोविड-19 लसीकरणाचा पूर्वाभ्यास केला जात आहे. जेणेकरुन प्रत्यक्ष लसीकरणावेळी काही अडचणी येऊ नयेत.  

दरम्यान, देशातील दोन कोरोना लशींच्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. 13 जानेवारीपासून देशात लसीकरणाला सुरुवात होणार आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि फ्रंटलाईन वर्कर्संना प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर उर्वरित लोकसंख्येला लस दिली जाईल.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Health Minister Dr Harshvardhan said about Coronavirus Vaccine