esakal | 'कोरोना संकटात देशभरात 162 डॉक्टर, 107 नर्स आणि 47 आशा वर्करचा मृत्यू'
sakal

बोलून बातमी शोधा

corona doctors

सध्या कोरोनाची  परिस्थिती हातात असली तरीही कोरोना विषाणू विरोधातील या लढाईत कित्येकांनी आपले प्राण गमावले आहेत.

'कोरोना संकटात देशभरात 162 डॉक्टर, 107 नर्स आणि 47 आशा वर्करचा मृत्यू'

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या संकटाने गेल्या एक वर्षापासून थैमान घातले आहे. गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्याच्या अखेरीसच कोरोनाचा पहिला रुग्ण केरळ राज्यात आढळला होता. त्यानंतर हा प्रादुर्भाव वाढत गेला आणि मग मार्च महिन्यात देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केली गेली. सध्या कोरोनाची  परिस्थिती हातात असली तरीही कोरोना विषाणू विरोधातील या लढाईत कित्येकांनी आपले प्राण गमावले आहेत. ही लढाई लढण्यासाठी अनेक कोविड योद्ध्यांनी आपल्या जीवाची बाजी लावली. यामध्ये आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी तर होतेच त्याचबरोबर पोलिस आणि इतर प्रशासकीय यंत्रणेतील कर्मचारी देखील या लढ्यात फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करत होते. 

सरकारने संसदेत सादर केलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारीपर्यंत 162 डॉक्टर्स, 107 नर्सेस आणि 44 आशा वर्कर्सचा कोरोना विरोधातील लढाई लढताना मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी संसदेत विचारलेल्या एका प्रश्नाला लिखित उत्तर देताना याबाबतची माहिती दिली.  

भारतात जानेवारी महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सीन ही लस मंजूर झाली. 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा पहिला टप्पा सुरु करण्यात आला आहे. यानुसार, फ्रंटलाईन वर्कर्सना सर्वांत आधी लस दिली जात आहे. सध्या भारतातील कोरोनाची स्थिती दिलासादायक आहे. भीषण परिस्थिती मागे पडली असून सध्या परिस्थिती हाताबाहेर नाहीये. भारतात गेल्या 24 तासांत 8,635 रुग्ण आढळले आहेत. गेल्या 8 महिन्यांमध्ये आढळलेली ही सर्वांत कमी रुग्णसंख्या आहे. 

हेही वाचा - Corona Update : गेल्या 8 महिन्यांतील सर्वांत कमी रुग्णवाढ; आतापर्यंत 39,50,156 जणांना लस
या नव्या रुग्णसंख्येसह देशातील आजवरच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ही 1,07,66,245 वर पोहोचली आहे. देशातील आजवरच्या एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या ही 1,04,48,406 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 94 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या मृतांसह देशातील आजवरच्या एकूण मृतांची संख्या ही 1,54,486 वर जाऊन पोहोचली आहे. सध्या देशात 1,63,353 रुग्ण ऍक्टीव्ह आहेत. लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत 39,50,156 जणांना लस दिली गेली आहे. काल सरकारने संसदेत बजेट सादर केलं आहे. यामध्ये आरोग्य क्षेत्राला गेल्या वर्षीच्या बजेटच्या तुलनेत तब्बल 137 टक्क्यांची वाढ केली आहे. भारतात कोरोना लसीकरणासाठी 35 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.