Omicron : केंद्राचं राज्यांना पत्र, योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Pandemic

Omicron : केंद्राचं राज्यांना पत्र, योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना

नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट सापडला आहे. ओमीक्रॉन (Omicron Corona Variant) असे या व्हेरियंटचे नाव ठेवले असून हा व्हेरीयंट अधिक वेगाने पसरतो. तसेच लसीकरण झालेल्या लोकांना देखील याची लागण होत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वच देशांची झोप उडाली आहे. याच पार्श्वभूमीवर केंद्राने राज्यांना पत्र लिहिले आहे.

महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटकामध्ये दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच हा विषाणू वेगाने पसरत असल्यामुळे त्याचा धोका शेजारच्या राज्यांना धोका आहे. मात्र, या दोन्ही व्यक्तींना याच नव्या व्हेरीयंटची लागण झाली का? याबाबत अद्यापही खुलासा झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना लिहिले आहे. सर्व राज्यांनी योग्य प्रतिबंध करून आणि पाळत ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्या आणि लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

दक्षिण आफ्रिका, बोट्स्वाना, हाँगकाँग आणि इस्राईलमध्ये आढळलेला ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा नवीन प्रकार वेगाने फैलावणारा व चिंताजनक प्रकार आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे. ग्रीक वर्णमालेनुसार ओमीक्रोन हे अक्षर १५ व्या क्रमाकांवर आहे. जगभरात ठिकठिकाणी कोरोनाचे अनेक प्रकार आले आहेत. ‘सार्स-सीओव्ही-२’चा ‘बी.१.१.५२९’ हा १५ वा प्रकार आहे. यामुळेच ‘डब्लूएचओ’ने त्याला ‘ओमीक्रोन’ नाव दिले आहे. अमेरिका, पाकिस्तान, कॅनडा, सौदी अरेबियासह सात देशांनी दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे.

टॅग्स :Omicron Variant