गृहमंत्री अमित शहा रात्री उशिरा पश्चिम बंगालमध्ये, निवडणुकीची रणनीती ठरवणार ?

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 19 December 2020

अमित शहा हे कोलकाताला येण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत.

कोलकाता- बिहारमधील निवडणुकीनंतर आता संपूर्ण देशाचे लक्ष हे पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांकडे लागले आहे. भाजप गेल्या अनेक दिवसांपासून बंगाल निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसांच्या कोलकाता दौऱ्यावर पोहोचले आहे. अमित शहा यांच्या स्वागतासाठी भाजपचे हजारो कार्यकर्ते रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. 

भाजपचे चाणक्य समजले जाणार अमित शहा रात्री उशिरा कोलकाता विमानतळावर पोहोचले. यावेळी हजारो कार्यकर्ते विमानतळावर आले होते. शहा हे काही अंतर चालत जात कार्यकर्त्यांचे अभिवादन स्वीकारले. शहा हे शनिवार आणि रविवार असे दोन दिस पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. राज्यात पुढीलवर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत बैठकही घेतील. राज्यात नुकताच झालेल्या राजकीय घटना पाहता अमित शहा यांचा हा दौरा खूप महत्त्वाचा मानला जातो. 

हेही वाचा- देशात आणखी एका आजाराचा शिरकाव; गुजरातमध्ये ९ जणांचा मृत्यू

अमित शहा हे कोलकाताला येण्यापूर्वी तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) काही दिग्गज नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. सुवेंदू अधिकारी यांच्यानंतर टीएमसीचे पूर्व मेदिनीपूर येथील आमदार बनश्री मेती यांनीही पक्षाचा राजीनामा दिला. त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा तथा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून आपल्या निर्णयाची माहिती दिली.

तत्पूर्वी ममता यांचे निकटवर्तीय आणि माजी परिवहन मंत्री सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला होता. आमदारकी सोडल्यानंतर एक दिवसानंतर गुरुवारी शुभेंदू यांनी तृणमूल काँग्रेसचा राजीनामाही दिला होता. त्याचबरोबर टीएमसीचे आमदार जितेंद्र तिवारी यांनीही पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शुक्रवारी बेरकपूरचे आमदार शीलभद्र दत्ता आणि कंथी उत्तरचे आमदार बनश्री मेती यांनीही राजीनामा दिला आहे. याचदरम्यान विरोधी पक्ष माकपालाही धक्का बसला. माकपाचे आमदार तापसी मंडल यांनी पक्षाचा त्याग केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Union Home Minister and BJP leader Amit Shah arrives in Kolkata for a two day visit to the West Bengal