केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 October 2020

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांनी रुग्णालयातच अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचा मुलगा चिराग पासवान यांनी ट्विटरवरून दिली. 

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री आणि लोकजनशक्ती पक्षाचे नेते रामविलास पासवान यांचं निधन झालं. दिल्लीतील रुग्णालयात काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, गेल्या काही दिवासांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. बिहारच्या राजकारणातील एक महत्त्वाचे नेते म्हणून, त्यांचा उल्लेख केला जातो. डॉ. मनमोहनसिंग यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारमध्ये ही त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात काम पाहिले होते. सध्या बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये प्रचाराचा धुरळा उडत असताना पासवान यांचे निधन झाले आहे. सध्या पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान त्यांच्या लोकजनशक्ती पक्षाची धुरा सांभाळत आहेत.  

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

विद्यार्थी चळवळ ते केंद्रीय मंत्री
विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले रामविलास पासवान संयुक्त जनता दलात होते. 2000मध्ये त्यांनी संयुक्त जनता दलातून बाहेर पडत लोकजनशक्ती पार्टीची स्थापना केली होती. बिहारमधील मागास वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा चेहरा म्हणून पासवान यांची ओळख होती. 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेससोबत युती करण्याची तयारी केली होती. काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी भाजपसोबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय योग्य ठरला आणि ते मोदी सरकारमध्ये केंद्रात मंत्री झाले. सध्या त्यांच्याकडे देशाच्या अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: union minister ramvilas paswan passes away